बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर २०२३ मध्ये प्रदर्शित होणारा त्याचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. नुकताच तो एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने कलाकारांच्या मानधनाच्या मागणीवर भाष्य करतानाच काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्याच्या या पॉडकास्टचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
करण जोहर नुकताच मास्टर्स युनियन पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने चित्रपटाची कमाई आणि कलाकाराचं मानधन यावर बरेच प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, “माझ्या स्वतःचे वेगळे विचार आहेत. हिंद चित्रपट माझं प्रेम आहे. पण जर तुम्ही मला एक बिझनेसमन म्हणून विचाराल तर मला वाटतं की आम्ही तेलुगू इंडस्ट्रीपेक्षा खूपच पुढे आहोत.”
आणखी वाचा- करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार
याच पॉडकास्टमध्ये जेव्हा करणला, “चित्रपटाच्या कमाईचा किती भाग कोणाला मिळतो?” असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “यातला एक भाग चित्रपटात काम करणाऱ्या कलाकरांकडे असतो. आता असं विचारल्यानंतर माझी हत्याही होऊ शकते. पण जर चित्रपटाची कमाई ५ कोटी रुपये होतेय आणि तुम्ही माझ्याकडे २० कोटी रुपये एवढं मानधन मागत असाल तर हे कितपत योग्य आहे?”
आणखी वाचा- Video: आकर्षक पेंटिंग्स ते छोटंसं किचन…’अशी’ आहे करण जोहरची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन
करण जोहर पुढे म्हणाला, “मी माझी धर्मा प्रॉडक्शन कंपनी दोन लोकांसह सुरू केली होती. एखाद्या स्टार्टअपसारखी ही सुरुवात होती. त्यावेळी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरत नव्हता. ना त्या चित्रपटांचं बजेट अवाजवी असायचं.” अर्थात कलाकारांच्या मानधनाबद्दल करण जोहरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली नाही. २०१८ मध्येही त्याने मानधनाची मोठी रक्कम मागणाऱ्या कलाकारांना सुनावलं होतं. “मानधन म्हणून मोठी रक्कम मागितली जाते मात्र यांचे चित्रपट चांगली ओपनिंगही करू शकत नाही.” असं त्याने यावेळी म्हटलं होतं.