निर्माता-दिग्दर्शक करण जोहर अनेक कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याचे नवे सिनेमे, नवीन प्रोजेक्ट्सच्या घोषणा आणि सिनेमाचं प्रमोशन, यामुळे करण सतत लाइमलाइटमध्ये असतो. नुकतंच त्याने कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी तिकीट न मिळाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती, ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला. मात्र, करणला असं सतत चर्चेत राहणं कधी कधी त्रासदायक ठरतं. करणला अनेकदा घराणेशाही आणि मोठ्या अभिनेते आणि दिग्दर्शकांच्या मुलांना लॉन्च करतो म्हणून ट्रोल केलं जातं. नुकतंच, करणला त्याच्या निर्मिती असलेल्या आगामी ‘जिगरा’ सिनेमासाठी ट्रोल करण्यात आलं आहे आणि करणने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
करण जोहरवर आलिया भट्टला ‘जिगरा’ चित्रपट मिळवून देण्यात मदत केल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत, यामुळे करण जोहर निराश झाला असून, त्याने ट्रोलर्सना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे.
करण जोहर का होतोय ट्रोल?
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला, दिग्दर्शक वासन बाला यांच्या एका मुलाखतीतील क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये वासन यांनी उल्लेख केला की करणने आलियाला त्याच्या स्क्रिप्टची अपूर्ण आवृत्ती पाठवली होती. वासन यांनी याबद्दल विनोद करत सांगितलं की, जर त्यांना माहीत असतं की ही स्क्रिप्ट आलियाकडे जाणार आहे, तर त्यांनी ती व्यवस्थित फॉरमॅट करून आणि संपादित करून पाठवली असती. सोशल मीडियावर अनेकांनी या टिप्पणीचा चुकीचा अर्थ घेतला, ज्यामुळे करण जोहरवर ‘घराणेशाहीला प्रोत्साहन’ देत असल्याची टीका करण्यात आली.
करण जोहर काय म्हणाला?
घराणेशाहीच्या टीकेला उत्तर देत करणने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात ‘आय एम सल्मिया’ यांचा एक कोट आहे. करणने या पोस्टमध्ये लिहिलं, “ट्विटर X बनलं, पण माझ्यासाठी ते खूप आधीच X झालं… मी या त्रासदायक आवाजाशी नातं तोडलं आणि अनावश्यक संतापाला म्यूट केलं… परंतु, सोशल मीडिया म्हणजे लोच नेस मॉन्स्टरसारखं आहे, ज्याचा परिणाम आपल्यावर होतो, अगदी तो दिसत नसला तरीसुद्धा. वासन बाला यांच्या मुलाखतीतील त्याच्या विनोदी आणि प्रेमळ उत्तराचं अनेकांना चुकीचं आकलन झालं, ज्यात त्याने म्हटलं की मी आलियाला त्याच्या स्क्रिप्टचं व्याकरण तपासणी न करता पाठवलं होतं. सुरुवातीला त्याच्या या विधानावर मी हसलो होतो, पण आता ते खरंच त्रासदायक वाटतं.”
कृपया वासनची मुलाखत नीट पाहा आणि ऐका
करण पुढे लिहितो, “वासन माझा सर्वात प्रतिभावान आणि उत्कृष्ट सहकारी आहे आणि जर तुम्ही त्याची मुलाखत पाहिली तर त्याच्या स्वरातून तुम्हाला पूर्णपणे समजून येईल की, तुम्ही जो अर्थ काढत आहात तो त्याच्या म्हणण्याचा अर्थ अजिबात नाहीये. पण नाही…, त्यात काही नसतानाही लोकांनी चुकीचा अर्थ काढत या गोष्टीला मोठं करून ठेवलं आहे… मी हात जोडून सर्वांना सांगतो, कृपया संपूर्ण मुलाखत पाहा आणि ऐका, त्याआधी कोणताही निष्कर्ष काढू नका. सर्वांवर खूप प्रेम!”