दिग्दर्शक करण जोहर सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच करणने थ्रेड्स ॲपवर नवे अकाऊंट ओपन केले. यावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्याने १० मिनिटांसाठी ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतले. यावेळी करणला त्याच्या चाहत्यांनी वैयक्तिक आयुष्य तसेच त्याच्या आगामी चित्रपटांविषयी काही प्रश्न विचारले.
हेही वाचा : “आयुष्यातील पहिले कथक नृत्य…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
थ्रेड्सवर करण जोहरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. एका युजरने त्याला विचारले, “तू गे आहेस ना?” यावर करणने “तुला माझ्यात काही रस का?” असे मजेशीर आणि थेट उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच दुसऱ्या एका युजरने करणला, “तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत काय?” असा प्रश्न विचारला यावर तो म्हणाला, “मला माझ्या आवडत्या अभिनेत्री श्रीदेवी मॅमबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही.”
हेही वाचा : Video : “बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले…”, जिनिलीया आणि रितेश देशमुखचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
एका थ्रेडमध्ये करणला “भविष्यात धर्मा प्रोडक्शन आणि शाहरुख खान पुन्हा एकत्र काम केव्हा करणार?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला, “असे कोणतेही प्रश्न मला विचारू नका, कारण मी खोटे बोलणार नाही.”
“एका २० वर्षाच्या मुलाला तुमच्यासारखा दिग्दर्शक बनायचे आहे त्याला तुम्ही काय सल्ला द्याल?” या थ्रेडला उत्तर देत करण म्हणाला, “तुझ्या आयुष्याबाबत निष्कर्ष काढणाऱ्या लोकांचे न ऐकता स्वत:वर विश्वास ठेव. चित्रपटाचा आवश्यक तो सगळा अभ्यास कर…दिग्दर्शक होणे अनेकदा आव्हानात्मक ठरते कारण, लोकांशी आणि कधीकधी त्यांच्या अहंकाराबरोबर जुळवून घ्यावे लागते.”
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार असून यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंहने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.