बॉलीवूडचा सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. करणने बॉलिवूडला अनेक मोठे आणि हिट चित्रपट दिले आहेत. करण कधी त्याच्या चित्रपटांमुळे, कधी त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमुळे तर कधी त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या चित्रपटांच्या रेटिंग सिस्टिमबद्दल भाष्य केलं आहे. तसेच तो कधीकधी त्याच्या चित्रपटाबद्दल चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी लोकांना पैसे देतो, असा खुलासा त्याने केला आहे.
‘गॅलाटा प्लस’ शी बोलताना करणने सांगितलं की त्याला त्याच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी काय काय करावे लागते. यावेळी त्याने समीक्षकांचीही पोलखोल केली. तसेच इंडस्ट्रीतील लोक त्यांचा चित्रपट हिट करण्यासाठी कोणत्याही थराला जातात, असा खुलासा त्याने केला. करण म्हणाला, “अनेकदा आम्ही आमच्याच लोकांना पीआरसाठी पाठवतो आणि त्यांना चित्रपटाचे कौतुक करायला सांगतो आणि ते कौतुक करतात. कधी कधी तुम्ही ब्लॉकबस्टर फिल्म बनवू शकत नाही. त्यामुळे साधारण चालणाऱ्या साहजिकच चित्रपटाबद्दल चांगले व्हिडीओ यावेत असं वाटतं. त्यामुळे जेव्हा आम्हाला चित्रपटाबद्दल चांगल्या गोष्टी बोलणारे समीक्षक सापडतात, तेव्हा आम्ही त्यांना स्टारमध्ये रेटिंग द्यायला सांगतो. नंतर त्याचे मोठे पोस्टर्स बनवतो. यापैकी काही तर समीक्षकही नसतात.”
करण जोहर पुढे म्हणाला, “कधी कधी एखादा चित्रपट हिट करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. चित्रपट निर्माते असल्यामुळे आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. मी टीकेवर टीका करू शकतो, पण जेव्हा ते एखाद्या चित्रपटाचे कौतुक करतात तेव्हा मी त्यांच्या पाठीवर थापही देऊ शकतो. प्रत्येक चित्रपटानुसार मी बदलतो. जे लोक थिएटरच्या बाहेर फिरत असतात त्यांना चित्रपटाबद्दल बोलायचं असतं. खरे प्रेक्षक आता राहिले नाहीत. पण काही लोक मोठ्या आवाजात प्रतिक्रिया देतात, कारण त्यांना व्हायरल व्हायचं असतं. त्यासाठी ते हवं ते बोलत असतात.”
करण जोहरने यावेळी समीक्षकांवर टीका केली. “तुम्ही चित्रपटाच्या कथेवर टीका करता, पण हा सीन चित्रपटात असाच असायला हवा होता, असं म्हणत तुम्ही स्वत:चीच कथा का सांगू लागता? हा हिरो असायला हवा होता, असं तुम्ही म्हणता पण ते तसं नाहीये ना,” असं करण जोहर समीक्षकांना म्हणाला.