बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) ही चित्रपटातील तिच्या भूमिकांमुळे आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असते. नुकतीच तिने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या पर्वात हजेरी लावली होती.
शनिवारी नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनचा पहिला भाग प्रदर्शित झाला. याच्या पहिल्या भागात ‘जिगरा’ चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. आलिया भट्टबरोबरच वेदांग रैना, दिग्दर्शक वासन बाला आणि निर्माता करण जोहर हेदेखील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या भागात दिसले.
जेव्हा कपिलने आलिया आणि करण जोहर यांच्यातील नाते कसे आहे, त्यांच्यातील बॉन्ड कसा आहे याबद्दल विचारले, त्यावेळी आलिया ही मला माझ्या मुलीसारखी आहे, असे करण जोहरने म्हटले. याबरोबरच तिला ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये ज्यावेळी भूमिका मिळाली होती, त्यावेळचा एक किस्साही सांगितला.
काय म्हणाला करण जोहर?
करण जोहरने आलियाबरोबर असलेल्या नात्याविषयी बोलताना म्हटले, “आता मी यश आणि रुहीचा वडील आहे. मात्र, सर्वात आधी मला आलियासाठी वडील म्हणून प्रेम जाणवले होते. आम्ही व्हॅनिटी व्हॅनमध्ये आलियाची लूक टेस्ट करत होतो, तिला माहीत नव्हते की ती चित्रपटात असणार आहे की नाही, इतकेच काय चित्रपटाचे नाव काय आहे, हे देखील तिला माहीत नव्हते. ती तीन महिन्यांपासून तंदुरुस्त राहण्यासाठी खूप मेहनत घेत होती.”
पुढे बोलताना करण जोहरने म्हटले, “फोटो सेशननंतर मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेलो, तिथे आलियाची आई सोनी राजदानदेखील होत्या. तिला आम्ही मोठा कपकेक दिला आणि सांगितले की तुला चित्रपटात भूमिका मिळाली आहे आणि मी तो चित्रपट दिग्दर्शित करत आहे. आलिया खूप भावुक झाली आणि तिचा पहिला प्रश्न होता, “मी हा कपकेक खाऊ शकते का?” त्यावेळी मला तिच्याबद्दल मुलगी म्हणून प्रेम जाणवले. तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत आलिया माझी पहिली मुलगी आहे”, असे म्हणत करण जोहरने आलियाबद्दल असलेल्या आपल्या नात्याबद्दल आणि त्यांच्यामध्ये असलेल्या बॉंडिंगबद्दल सांगितले आहे.
कपिल शर्मा आणि करण जोहर या दोघांनीही आलियाच्या चित्रपटातील यशस्वी प्रवासाबद्दल तिचे कौतुक केले.
आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे तर तिची मुख्य भूमिका असलेला ‘जिगरा’ चित्रपट ११ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्याबरोबर दिसणार आहे. याबरोबरच, ‘ब्रम्हास्त्रा २’ आणि ‘अल्पा’ या चित्रपटांतदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.