यंदा अनेक मोठ्या बजेटचे बॉलिवूड चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर बॉलिवूड चित्रपटांची तुलना दाक्षिणात्य चित्रपटांशी होऊ लागली. अशातच अनेक बॉलिवूड निर्माते यावर भाष्य करताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपने ताशेरे ओढले होते, त्यानंतर आता निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने बॉलीवूडच्या मूळ कंटेंट बनविण्याच्या अक्षमतेबद्दल काही गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण स्वतःही इंडस्ट्रीतला भाग असून कंटेट निर्मितीत अक्षम असल्याची टीकाही त्याने केली. हिंदी चित्रपटसृष्टीत मूळ कंटेंट तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या हिंमतीची कमतरता आहे आणि बऱ्याचदा बॉलिवूड निर्माते बँडवॅगन आणि ट्रेंडमध्ये अडकतात, असा आरोपही त्याने केला आहे.
बॉलिवूडमधील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या करणने अलिकडच्या वर्षांत भारतातील मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि इतर सर्व चित्रपट उद्योगांच्या तुलनेत हिंदी चित्रपट उद्योग काय चुकीचं करत आहे याबद्दल त्याचं स्पष्ट मत नोंदवलं. Galatta Plus ने आयोजित केलेल्या राउंड टेबल चर्चेत करणने याबद्दल त्याची मतं नोंदवली.
मुलानेच केली अभिनेत्रीची हत्या, मृतदेह फेकला माथेरानच्या जंगलात; धक्कादायक कारण आलं समोर
‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, करण म्हणाला, “मला वाटतं की मुख्य समस्या ही आहे की आपण हिंदी चित्रपटातील मेन स्ट्रीम इंडस्ट्रीतून आलो आहोत आणि अर्थात त्यात मीदेखील आहे, ज्यामध्ये या पॅनेलवरील इतर प्रत्येक सिनेमासारखी एकही मजबूत क्वालिटी नाही. इथेच आपण चुकतोय, कारण आपल्याला नेहमी प्रवाहाबरोबर जायचं आहे. ७० च्या दशकात सलीम-जावेद यांच्या रुपात आपल्याकडे ओरिजनल आवाज होता. पण नंतर आम्ही एक विशिष्ट व्यक्तिरेखा तयार केली. त्यानुसार प्रत्येक चित्रपटात चिडलेल्या आणि संतप्त हिरोची संकल्पना निर्माण झाली. मग ८० च्या दशकात, अचानक काहीतरी घडलं आणि रिमेकचा ट्रेंड आला आणि तिथूनच खरी समस्या सुरू झाली. आपण तमिळ आणि तेलुगूमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रत्येक चित्रपटाचा रिमेक करायला सुरुवात केली.”
पुढे करण म्हणाला, “९० च्या दशकात एक प्रेमकथा असलेला चित्रपट आला होता, ज्याची फार चर्चा झाली होती. तो होता ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट. त्या चित्रपटानंतर माझ्यासह सर्वांनी प्रेमाच्या त्या बँडवॅगनवर उडी घेण्याचे ठरवले आणि शाहरुख खान तयार झाला. पण ७० च्या दशकात आम्ही आमची सर्व मुळे सोडून दिली. मग ‘लगान’ला २००१ मध्ये ऑस्करसाठी नामांकन मिळाले आणि प्रत्येकाने अशा प्रकारचे चित्रपट बनवायला सुरुवात केली. २०१० मध्ये ‘दबंग’ने चांगली कामगिरी केली आणि आम्ही सगळेच पुन्हा तसे व्यावसायिक चित्रपट बनवायला सुरुवात केली. खरं तर तीच समस्या आहे. आमच्यात खरंच कमतरता आहे आणि मी हे दुसऱ्यांना सांगत असताना स्वतःलाही सांगतोय, आमच्याकडे स्वतःचं असं वेगळेपण काही नाही आणि आम्ही फक्त ट्रेंडमागे धावतोय, बॉलिवूडने इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांकडून याच गोष्टी शिकायला हव्या,” असं स्पष्ट मत करणने नोंदवलं.