बॉलिवूड निर्माता करण जोहर हा सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमुळे चांगलाच चर्चेत आहे. बऱ्याच सेलिब्रिटीजनी करणच्या या शोवर हजेरी लावलेली आहे. तरी करणच्या प्रत्येक सीझनमध्ये हजेरी लावणाऱ्या शाहरुख खानची कमतरता प्रेक्षकांना अधिक भासू लागली आहे. आठव्या सीझनमध्येसुद्धा शाहरुख खान दिसणार याची चर्चा होती, परंतु अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर न आल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत.

कोविडनंतर शाहरुखने करण जोहरच्या टॉक शोवर हजेरी लावलेली नाही. शाहरुख शेवटचा या शोवर आलिया भट्टसह ‘डियर जिंदगी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान आला होता. तेव्हापासून प्रेक्षक शाहरुखच्या नव्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. नुकतंच करण जोहरनेही यावर भाष्य केलं आहे. शाहरुख हा आपलं कुटुंब आहे आणि तो आपल्या टॉक शोवर येण्यास कधीच नकार देत नाही असं स्पष्टीकरणही त्याने दिलं आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह इंटीमेट सीन देणारी तृप्ती डिमरी रातोरात बनली नॅशनल क्रश; जाणून घ्या अभिनेत्रीचा प्रवास

करण म्हणाला, “माझ्या माहितीप्रमाणे शाहरुख हा असा एकमेव मेगास्टार आहे ज्याने त्याच्या मर्जीने संभाषण करण्याचा अधिकार कमावला आहे. मी आणि त्याच्या जवळचे बरेच मित्र आणि कुटुंबीय यांना ही गोष्ट ध्यानात यायला हवी. तो माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे, मी त्याला कधीही मुलाखतीसाठी विचारलं तर तो मला नाही म्हणत नाही, त्यामुळे मी कधीच त्याला विचारत नाही, कारण त्याला मला नकार द्यावा लागेल अशा परिस्थितीमध्ये मी त्याला पाहू इच्छित नाही.”

पुढे करण म्हणाला, “शाहरुख हा माझ्यासाठी माझं जग आहे, माझा मोठा भाऊ आहे. जेव्हा योग्य वेळ येईन तेव्हा मी त्याला नक्की मुलाखतीसाठी विचारेन अन् त्यालाही जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हाही तो नक्की माझ्याशी बोलेल कारण संभाषणात कुणीही त्याचा हात पकडू शकत नाही. तो जेव्हा कोणत्याही मंचावर बोलतो तेव्हा त्याच्यातील शब्दांच्या जादूगाराला ऐकत राहावं असंच वाटतं. तो फक्त स्क्रीनसमोरचच नव्हे तर ऑफ स्क्रीनसुद्धा बादशाह आहे.”

आणखी वाचा : “किमान शिकलेल्या लोकांकडून…” ‘अ‍ॅनिमल’वर होणाऱ्या टिकेविषयी अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत

याबरोबरच करण शाहरुखच्या ‘कॉफी विथ करण’मधील उपस्थितीबद्दल पुढे म्हणाला, “मला या शोवर शाहरुखची कमतरता कधीच भासत नाही कारण मी दररोज त्याच्याबरोबर रोज रात्री ‘कॉफी विथ करण’चा शो करतो. बहुतेककरून दररोज संध्याकाळी शाहरुख, गौरी, त्याचे कुटुंब आणि मी आम्ही एकत्र भेटतो अन् भरपुर गप्पा मारतो. अगदी ‘कॉफी विथ करण’सारखंच.” करणच्या टॉक शोच्या आगामी भागात कियारा अडवाणी विकी कौशल हजेरी लावणार आहेत.