Karan Johar : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहत असतो. अनेकदा करण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलताना दिसतो. अशातच काही आठवड्यांपूर्वी करणने एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. तेव्हा त्याला पाहून सर्वांनाच धक्का बसला. या सोहळ्यात करणची प्रकृती खूपच खालावलेली जाणवली होती.
करणच्या या प्रकृतीबद्दल त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. याबद्दल अनेकांनी सोशल मीडियाद्वारे विचारणाही केली होती. अशातच आता करणने स्वत: त्याच्या तब्येतीबद्दल मौन सोडले आहे. तसंच करणने त्याची प्रकृती आता अगदी उत्तम आहे आणि तो पूर्णपणे ठीक आहे असंही म्हटलं आहे. शिवाय त्याने त्याच्या कमी वजनाबद्दलही चाहत्यांना सांगितलं आहे. याबद्दल करणने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे माहिती दिली आहे.
करणने वजन कमी करण्याबद्दल असं म्हटलं की, “माझी रक्त तपासणी केली आणि त्यात असे दिसून आले की, मला माझ्या रक्ताची पातळी दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.” ‘न्यूज१८’ नुसार, करणने यावेळी असंही म्हटलं की, “मी पूर्णपणे ठीक आहे. माझे आरोग्य चांगले आहे. पण चाचणी केल्यानंतर मला कळले की, मला माझ्या रक्ताची पातळी दुरुस्त करायची आहे. यासाठी मी औषधे घेत आहे.”
यानंतर करणने त्याच्या कमी वजनाबद्दल असं म्हटलं की, “वजन कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे मी दिवसातून एकदाच जेवण करत आहे. याशिवाय मी पॅडलबॉल खेळायचो आणि पोहायचो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली. माझे बारीक होणे हे आरोग्याच्या कारणास्तव होते आणि ते निरोगी व योग्य त्या मार्गांनी केले गेले आहे.” यानंतर करणने कोणत्याही लोभाला बळी न पडता निरोगी आणि आवश्यक प्रमाणातच खाण्याचा सल्ला चाहत्यांना दिला.
दरम्यान, करण जोहरने आजवर ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सारखे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. यानंतर आता तो ‘चंदा मेरा दिल’ या चित्रपटाच्या तयारीत आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नसली तरी या वर्षीच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.