१६ ऑक्टोबर १९९८ या दिवशी करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि करण जोहरच्या रुपाने नवा दिग्दर्शक बॉलिवूडला मिळाला. ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या दोन चित्रपटांनंतर सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा सिनेमा आहे. शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि सलमान खान यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खानची ‘रोमँटिक हिरो’ ही इमेज ठळक करण्यात या सिनेमाचा सिंहाचा वाटा आहे.
हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद अन् प्रेम पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी करण जोहर मात्र भारतात नव्हता. करण व त्याच्या कुटुंबाला काही कारणास्तव सुरक्षेखातर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच दिवशी देशाबाहेर जावे लागले असल्याचा खुलासा नुकताच दिग्दर्शकाने केला आहे.
आणखी वाचा : ‘ब्लॅक फ्रायडे’मध्ये अभिनय करणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक; दिग्दर्शक इम्तियाज अलीचा खुलासा
‘पिंकव्हीला’शी संवाद साधतान करण म्हणाला, “१६ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित झाला पण नेमका तेव्हा मी या देशात नव्हतो. त्यावेळी मला व माझ्या कुटुंबाला धमक्यांचे फोन आले असल्याने सुरक्षेसाठी आम्ही चित्रपट प्रदर्शित होणार त्याच्या आदल्या रात्रीच देश सोडून बाहेर गेलो होतो. नंतर माझ्या मित्रांनी चित्रपटगृहात जाऊन सलमानच्या एंट्रीच्या सीनवेळी अन् अशा बऱ्याच ठिकाणी मला फोन करून प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद ऐकवला. ते सगळं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी दाटून यायचं कारण हे सगळं अनुभवायला मी तिथे नव्हतो.”
याबरोबरच हा चित्रपट आपल्या मायदेशी आपल्या प्रेक्षकांसह बघायला न मिळाल्याची खंतही करण जोहरने व्यक्त केली. ‘कूछ कुछ होता है’च्या आठवणी आजही लोकांच्या मनात कायम आहेत. नुकताच हा चित्रपट २५ वर्षे होत असल्याच्या निमित्ताने पुन्हा रिलिज करण्यात आला. तसंच २५ रुपयांमध्ये तिकिट मिळणार असल्याने अवघ्या पाऊण तासात याचे शो हाऊसफुल झाले. मुंबईत तीन स्पेशल स्क्रिनिंग रविवारी करण्यात आली.