काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडममधील ‘नेपोटिझम’ हा मुद्दा प्रचंड चर्चेत आला होता. या गोष्टीवरून निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. करण जोहरने आतापर्यंत त्याच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक स्टारकिड्सना लॉन्च केलं आहे. आता पुन्हा एकदा तो एका लोकप्रिय स्टारकिडला त्याच्या चित्रपटात संधी देणार आहे.
करण जोहर हा नेहमी कलाकारांच्या मुलांनाच चित्रपटांच्या ऑफर्स देतो, स्टारकिड्स आणि बाहेरून या इंडस्ट्रीत आलेले कलाकार यांच्यात भेदभाव तसंच, इतर कलाकारांना तो संधी देत नाही अशा अनेक टीकांना त्याला सामोरं जावं लागलं होतं. या सगळ्या नंतर मध्यंतरी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर करण जोवर आता पुन्हा एकदा एका प्रसिद्ध कलाकाराच्या मुलाला त्याच्या चित्रपटातून लॉन्च करणार असल्याचं समोर आलं आहे. हा अभिनेता म्हणजे इब्राहिम अली खान.
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय स्टारकिड आहे. तो नेहमी चर्चेचा विषय ठरतो. त्याचे वडील सैफ अली खान आणि त्याची बहिण सारा अली खान यांच्या प्रमाणेच इब्राहिमबद्दलही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता तो मोठा पडद्यावर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.
इब्राहिमने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं आहे. करण जोहरच्याच आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी इब्राहिमने सहाय्यक दिग्दर्शन केले. त्यानंतर आता तो पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. बोमन इराणी यांचा मुलगा कायोझ इराणी दिग्दर्शित आगामी चित्रपटात इब्राहिम अली खान झळकणार आहे.
हेही वाचा : “तुला पर्सनल मेसेज करण्यासाठी मला…”; आलिया भट्टने शेअर केला इब्राहिम अली खानचा ‘तो’ मेसेज
या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या माध्यमातून केली जाणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नाही. तसंच हा चित्रपट करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात येईल असंही समोर आलं आहे. इब्राहिमची बहिण सारा अली खान हिने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे इब्राहिम अली खानही आपली छाप प्रेक्षकांवर पाडू शकेल का हे बघण्यासाठी असे चाहते उत्सुक आहेत.