२०२३ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ हा कालच सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. त्याचं कारण म्हणजे शाहरुख खान चार वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेत. शाहरुखच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींना देखील या चित्रपटाने भुरळ घातली आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने या चित्रपटाच्या टीमसाठी एक खास पोस्ट लिहिली.
करण जोहर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेला पाहायला मिळतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी तो त्याच्या चाहत्यांची शेअर करत असतो. त्याचप्रमाणे मनोरंजन सृष्टीतील त्याच्या मित्र-मैत्रिणींचे भरभरून कौतुकही तो करतो. आता ‘पठाण’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून तो भारावून गेला आहे आणि त्यानिमित्त करणने या चित्रपटासाठी एक खास पोस्ट लिहिली.
त्याने लिहिलं, “मी चित्रपट पाहताना याआधी इतकं कधी एन्जॉय केलेलं मला आठवत नाही. हा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. चार्म, करिष्मा, शाहरुखचं स्टारडम, सर्वात सुंदर व सर्वांचं लक्ष वेधून घेणारी एजंट दीपिका पदुकोण आणि सगळ्यात उत्कृष्ट व्हिलन जॉन अब्राहम. चित्रपटात सिद्धार्थ आनंदच उत्कृष्ट दिग्दर्शन कौशल्य दिसत आहे. मला माझा मित्र आदित्य चोप्राचा अभिमान वाटतो. तुम्ही आदित्य चोप्राला पाहिलं नसेल पण त्याची दृष्टी कमाल आहे आणि राजा कुठेही गेला नव्हता. तो फक्त राज्य करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता. लव्ह यू शाहरुख भाई, लव्ह यू आदी, लव्ह यू बॉलिवूड.”
पुढे तो म्हणाला, “तुझी बदनामी करण्यात आली, तुझ्यावर चित्रपटावर बहिष्कार घातला गेला पण तू जेव्हा आपल्यामध्ये येतोस तेव्हा तुझ्या वाट्यामध्ये कोणीही अडसर निर्माण करू शकत नाही, ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. सगळ्यांना पठाणच्या शुभेच्छा. मला चित्रपटाची कथा सांगायची नाही; पण या चित्रपटातील सर्वात चांगला सिक्वेन्स शाहरुख आणि सलमान यांचा आहे. मी उभं राहून टाळ्या वाजवल्या.”
हेही वाचा : बक्कळ पैसा अन् प्रसिद्धी मिळवूनही शाहरुख खानची ‘ही’ इच्छा अपूर्णच, खुलासा करत म्हणाला…
या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत. तसंच हा वाढता प्रतिसाद बघून या चित्रपटाचे अनेक शो वाढवण्यात आले आहेत. तसंच पहिल्याच दिवशी हा चित्रपट देशभरातून पन्नास कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.