अभिनेता करण कुंद्रा याने ‘कितनी मोहोब्बत है’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर अनेक हिंदी मालिका, चित्रपट आणि ‘बिग बॉस’, ‘लॉक अप’ ‘रोडिज’सारख्या रिअॅलिटी शोजमध्ये करण झळकला. नुकतीच करणने हिंदुस्तान मोटर्सची नवीन कार घेतली होती. सोशल मीडियावर या कारचे फोटो आणि व्हिडीओजही त्याने शेअर केले होते. परंतु, करणची ही नवीन कार अचानक गायब झाली आहे.
करणने नवीन कार घेतल्याची पोस्ट कालच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आणि आज त्याची कार गायब झाल्याचा दावा तो करीत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करीत करण म्हणाला, “ज्या कोणी अशी मस्करी केली आहे ते फार चुकीचं आहे. ती माझी नवीन कार होती आणि मी नीट चालवलीसुद्धा नव्हती. अचानक परवेज आला आणि मला म्हणाला की, भाई कार गायब झाली आहे. मी मान्य करतो माझ्या कारमध्ये सिक्युरिटी सिस्टीम नाही आहे. कार ट्रॅकही होऊ शकत नाही आणि त्यात कॅमेराजपण नाही आहेत. पण, अशी मस्करी करू नका. माझे मित्र किंवा ज्याने कोणी अशी मस्करी केलीय ना त्यांनी कृपया करून मला कळवा की माझी कार कुठे आहे?”
करणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करीत लिहिले, “भावा, तेजस्वीला सांभाळ; नाही तर तिलापण कोणीतरी असंच गायब करेल.” तर दुसऱ्याने लिहिले, “कार तेजस्वी घेऊन गेली असेल.”
दरम्यान, करण कुंद्रा २०२१ पासून तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. जिनिलिया आणि रितेश देशमुखच्या ‘लेडीज वर्सेस जेंटलमन’ या गेम शोमध्ये दोघे भेटले होते. ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वात दोघांनीही सहभाग घेतला होता आणि त्या वेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.