अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यासाठी जुलै २०२४ मध्ये किम कार्दशियन आणि ख्लोए कार्दशियन या दोघीही बहिणी भारतात आल्या होत्या. मुंबईत पार पडलेल्या विवाह सोहळ्यात दोन सहभागी झाल्या होत्या. किम व ख्लोए यांनी त्यांच्या ‘द कार्दशियन्स’ या शोच्या ताज्या भागात या लग्न सोहळ्याचा उल्लेख केला आहे. या लग्नात लाखो फुलांचा वापर करण्यात आला होता. इतकंच नाही तर प्रत्येक गोष्टींवर सजावटीसाठी हिरे वापरले होते, असंही त्यांनी म्हटलंय.
ख्लोए म्हणाली की लग्नस्थळी खूप सुंदर व आकर्षक सजावट करण्यात आली होती. छतावरून लाखो फुलं लटकत असल्यासारखं वाटत होतं. तिने विवाहस्थळाची तुलना डिस्नेलँड राईडशी केली आणि ते लहानचं वेगळंच जग होतं, असं म्हटलं. तर किम म्हणाली खरंच ते एक वेगळंच जग वाटत होतं.
ख्लोए कार्दशियनने लग्नात राधिका मर्चंटच्या एंट्रीबद्दल सांगितलं. राधिकाने मोराच्या आकाराच्या बोटीवरून एंट्री घेतली होती. ख्लोए म्हणाली, “मौल्यवान रत्ने जडलेल्या मोराच्या आकाराच्या बोटीवरून वधू आली होती.” किम पुढे म्हणाली, “बऱ्याच वस्तूंवर सजावटीसाठी खरं सोनं वापरलं होतं. प्रत्येक गोष्टीत हिरे वापरले होते. गायींच्या पायात हिरेजडित दागिने होते. अंबानी कुटुंबाने लग्न समारंभात गायींची पूजाही केली होती.” लग्न खूपच भव्यदिव्य होते, असं या दोघी बहिणी म्हणाल्या.
अंबानींना ओळखत नसल्याचं किमचं वक्तव्य
किम म्हणाली की ती अंबानी कुटुंबाला ओळखत नाही, पण तरीही ती अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास करून आली होती. “मी अंबानी कुटुंबाला खरंच ओळखत नाही. पण आमचे काही कॉमन मित्र आहेत,” असं किमने सांगितलं.
किम आणि ख्लोए यांनी अंबानी कुटुंबाकडून मिळालेल्या लग्नाच्या निमंत्रणाबद्दल माहिती दिली. त्या इनव्हाइटचे वजन तब्बल ४०-५० पौंड (१८-२२ किलो) होते, असं त्यांनी सांगितलं. “आम्हाला मिळालेले इनव्हाइट ४०-५० पौंड वजनाचे होते आणि त्यातून संगीत येत होते,” असं ख्लोए म्हणाली. “ते इनव्हाइट खूप छान होतं त्यामुळे अशा गोष्टीला आम्ही नाही म्हणू शकत नाही, असं वाटलं,” असं तिने सांगितलं.