Kareena Kapoor : मागील महिन्यात १६ जानेवारीला सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. चोरीच्या उद्देशाने एक चोर त्याच्या घरात शिरला होता. त्यावेळी त्या चोराला सैफच्या घरातील गृहसेविकेने पाहिलं. दोघांचा वाद झाला तेव्हा सैफ अली खान मधे पडला. यानंतर सैफवर हल्लेखोराने चाकूचे वार केले. यामध्ये सैफला चांगलीच दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आणि चोराला अटकही झाली. दरम्यान करीना कपूरवर आता एका अभिनेत्याने जोरदार टीका केली आहे.
सैफवर झालेल्या हल्ल्याची माध्यमांवर चांगलीच चर्चा
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु झाल्या. सैफ अली खान राहात असलेल्या इमारतीची सुरक्षा इतकी ढिसाळ कशी काय? सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकाचं त्या ठिकाणी नसणं या सगळ्या गोष्टीही चर्चिल्या गेल्या. दरम्यान अभिनेता आकाशदीप साबिर आणि त्याची पत्नी शीबा या दोघांनीही या हल्ला प्रकरणावरुन करीनावर टीका केली आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान कोट्यवधी रुपये कमवतात तरीही ते एक सुरक्षा रक्षक आणि फुल टाइम ड्रायव्हर ठेवू शकत नाहीत का? असा सवाल या दोघांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
काय म्हटलं आहे आकाशदीप आणि शीबाने?
आकाशदीप आणि शीबा यांनी इंडस्ट्रीत स्त्री-पुरुषांना दिल्या जाणाऱ्या मानधनातील तफावतीबद्दल लेहरे रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत चर्चा केली. “दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं, म्हणून त्याला १०० कोटींपेक्षा जास्त मानधन आणि रश्मिका मंदानाला फक्त १० कोटी रुपये मिळाले, असं मत या दोघांनी नोंदवलं. यावेळी आकाशदीप करीनावर टीका करत म्हणाला, “म्हणून कदाचित २१ कोटींचं मानधन घेणाऱ्या करीनाला तिच्या घराबाहेर एक वॉचमन ठेवणं परवडत नाही असं वाटतं आहे. मला वाटतं की जेव्हा तुम्ही त्यांना १०० कोटी रुपये मानधन द्याल, तेव्हा कदाचित ते सुरक्षारक्षक आणि रात्रीच्या वेळीही ड्रायव्हरला कामावर ठेवू शकतील” असं म्हणत आकाशदीप आणि शीबा यांनी सैफ आणि करीनाची खिल्ली उडवली.
सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला १९ जानेवारीला अटक
वांद्रे भागात सैफ अली खानचं घर आहे. सैफ या घरात त्याची पत्नी करीना कपूर आणि त्याच्या दोन मुलांसह राहतो. त्याच्या याच घरात हल्लेखोर मोहम्मद शहजाद हा चोर चोरीच्या उद्देशाने शिरला होता. १६ जानेवारीला सैफवर हल्ला झाला. पोलिसांनी पुढच्या तीन दिवसांत म्हणजेच १९ जानेवारीला मोहम्मद शहजादला अटक केली. मात्र आता अभिनेता आकाशदीप याने याच प्रकरणावरुन करीनावर टीका केली आहे