बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून करीना कपूर ओळखली जाते. गेली अनेक वर्षे तिने उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. करीनादेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. पण आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.
करीना कपूरला अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर पाहण्यात येते. कधी शॉपिंगला, कधी पार्टीला, तर कधी ती कुटुंबीयांबरोबर जेवायला बाहेर जाताना दिसते. नुकतीच ती सैफ अली खानबरोबर डिनर डेटवर गेली होती. या दरम्यानचा तिचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी तिला चांगलेच खडे बोल सुनवायला सुरुवात केली.
या व्हिडीओमध्ये करीना गाडीतून उतरून हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. ती गाडीतून उतरताच तिची एक चाहती तिच्याशी हात मिळविण्यासाठी पुढे येते. पण करीनाचा अंगरक्षक तिच्या चाहतीला दूर सारतो. वारंवार ती करीनाशी हात मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. पण करीनाचा अंगरक्षक तिला करीनाच्या वाटेतून दूर करतो. अनेकदा ती, “मॅडम, एकदा हात मिळवा,” असे म्हणते. पण करीना फक्त तिच्याकडे पाहून हसून तिच्या या मागणीकडे दुर्लक्ष करते.
आणखी वाचा : मिस ‘पू’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार? करीनाने दिले संकेत
करीनाचे हे वागणे नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाही आणि यावरून त्यांनी करीनाला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने लिहिले, “तिने हात मिळवायला हवा होता.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “पैशांचा माज आला आहे या सर्वांना. शेवटी हे सगळे त्यांची लायकी दाखवतातच.” तर आणखी एकाने लिहिले, “तू हात मिळवू नकोस, पण प्रेमाने दोन शब्द बोलू तरी शकतेस ना. तू ते करायला हवे होतेस. पण हे सगळे लोके अत्यंत माजोरडे आहेत.” तर आणखी एकाने लिहिले, “आजकालच्या अभिनेत्रींना खूप गर्व आला आहे.” तर दुसरीकडे या व्हिडीओवर कमेंट करत करीनाच्या अनेक चाहत्यांनी तिची बाजू घेतली.