Kareena Kapoor Khan : अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात शिरलेल्या दरोडेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. सैफच्या मानेवर व पाठीवर आणि हातावर जखमा झाल्या. हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात चाकूचे एक टोक सैफच्या शरीरात घुसले होते, ते लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढले. या प्रकरणातील आरोपीला रविवारी अटक करण्यात आली आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीनाने निवेदन दिलं होतं, त्यानंतर आता तिने एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीनाने एक व्हिडीओ स्टोरीला रिपोस्ट करून हे सगळं थांबवा असं म्हटलं आहे. त्या व्हिडीओवर तैमूर व जेहसाठी नवीन खेळणी आणली आहेत, असं लिहिलं आहे. “हे सगळं थांबवा, थोडी दया दाखवा आणि आम्हाला एकटं सोडा,” असं तिने हा व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं आहे.

पाहा पोस्ट

करीना कपूर खानची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम स्क्रीनशॉट)

सैफ अली खान सध्या लिलावती रुग्णालयात दाखल आहे. जेह, तैमुर, करीना आणि इतर कुटुंबीय सैफला भेटायला रुग्णालयात जातानाचे व्हिडीओ समोर आले होते. सैफची आई शर्मिला टागोर, सैफची मुलं सारा व इब्राहिम सातत्याने रुग्णालयात ये-जा करत आहेत. याचदरम्यान हा व्हिडीओ पाहून करीनाचा राग अनावर झाला. करीनाने माणुसकी दाखवा, असं हा व्हिडीओ पोस्ट करून म्हटलं आहे.

अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी वांद्रे येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी रविवारी एकाला अटक करण्यात आली. ३० वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल ऊर्फ विजय दास असे आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरीफुल इस्लाम सज्जाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर बांगलादेशातील झलोकाठी जिल्ह्यातील राजाबरिया गावचा आहे, त्याने आपली खरी ओळख लपवण्यासाठी विजय दास या नावाचा वापर केला.

गुरुवारी पहाटे आरोपी सैफच्या वांद्रे येथील घरात घुसला होता. तिथे त्याने घरातील कर्मचाऱ्यांकडून एक कोटी रुपयांची मागणी केली होती. मग सैफ अली खान तिथे आला, त्याने त्याच्यावर हल्ला केला. जवळपास ७० तास इस्लाम फरार होता. हल्ला केल्यानंतर त्याने सतत आपली ठिकाणे बदलली आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कपडे देखील बदलले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor khan angry says leave us alone after seeing post about taimur and jeh saif ali khan attack hrc