अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या विविध भूमिकांमुळे चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. करीनाच्या उत्तम अभिनयामुळे ‘जब वी मेट’मधील ‘गीत’, ‘चमेली’, ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘पू'(पूजा) या भूमिका चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहिल्या आहेत. करीनाला बॉलीवूडमध्ये ट्रेंडसेटर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. झिरो फिगर ते फॅशनमधील अनेक ट्रेंड तिने बॉलीवूडमध्ये आणले. करीनाला यावर्षी बॉलीवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर तिच्या विविधांगी भूमिका असलेले चित्रपट सिनेमागृहात दाखवले जाणार असून, तिच्याच नावाने चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकतेच करीनाला तिच्याच सिनेमांच्या चित्रपट महोत्सवाच्या एका कार्यक्रमात “तुमच्या नावाने सिनेमहोत्सव सुरू होणार आहे, याची तैमूरला कल्पना आहे का?” हा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना करीना म्हणाली की, तो अजून खूप लहान आहे, त्यामुळे त्याला याबाबत तशी कमी माहिती आणि समज आहे. जेव्हा पापाराझी आमच्या मागे येतात, त्यावरून त्याला थोडी कल्पना असेल.
तैमूर म्हणतो, मी लोकप्रिय आहे का?
करीनाच्या नावाने सिनेमहोत्सव २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या महोत्सवाच्या एका कार्यक्रमात करीना म्हणाली की, “तैमूर आणि मी जेव्हा एकत्र असतो, तेव्हा पापाराझी आमचा पाठलाग करतात. तेव्हा तैमूर म्हणतो, ‘सर्व लोक आपला पाठलाग का करत आहेत? मी लोकप्रिय आहे का?’ त्यावर करीना तैमूरला म्हणाली की, ‘तू नाही, मी लोकप्रिय आहे. तू प्रसिद्ध होशील असं काम आजवर केलेलं नाही.’ यावर तैमूर म्हणतो, ‘ठीक आहे, मी आज प्रसिद्ध नसेन, पण मी एक दिवस असं काही काम करेन की मीसुद्धा लोकप्रिय होईन.’ करीना पुढे म्हणाली की, तैमूरला सध्या फुटबॉल खूप आवडतंय. आता तरी त्याचं लक्ष खेळात आहे, पण मला अशी आशा आहे की, काही वर्षांनी तो माझे सिनेमे बघेल.”
करीनाला बॉलीवूडमध्ये पंचवीस वर्षे पूर्ण
पीव्हीआरने करीनाला हिंदी चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट महोत्सवाची घोषणा करताना, तिच्या लोकप्रिय चित्रपटांच्या झलक दाखवणारा एक रील शेअर केला. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हाच रील रिपोस्ट केला, ज्यामध्ये तिच्या ‘अशोका’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चमेली’, ‘ओंकारा’, ‘जब वी मेट’ आणि ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ यांसारख्या चित्रपटांमधील दृश्ये दाखवली आहेत. ‘करीना कपूर खान महोत्सव’ २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत १५ शहरे आणि ३० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये होणार आहे.