एआयमुळे माणसाच्या आयुष्यात मोठे बदल होताना दिसत आहे. जगभरातील माहिती एका क्लिकवर देण्यापासून ते अवघड आकडेमोडी काही क्षणांत करण्यापर्यंत एआय मदत करते. याबरोबरच चॅट जीपीटी, मेटा एआय माणूस सांगेल त्याप्रमाणे माहिती, छायाचित्रे, नोट्स देत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी घिबली आर्टने धुमाकूळ घातला होता. घिबली आर्टची लोकांना भुरळ पडल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. या सगळ्यात एआयच्या चांगल्या वापराबरोबरच त्याचा वाईट पद्धतीनेदेखील वापर केला जातो. आता या एआयचा वापर करत करीना कपूर(Kareena Kapoor Khan)चा फोटो बनवला आहे आणि ती डान्स करीत असल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाकिस्तानमधील एका रेव्ह पार्टीमधील एक अॅनिमेटेड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. हा अॅनिमेटेड व्हिडीओ करीना कपूर खानचा आहे. यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. यामध्ये करीनाने फॉर्मल ड्रेस घातला असून तिने घट्ट वेणी घातल्याचे दिसत आहे. तसेच तिचे विचित्र हावभाव दिसत आहेत. याबरोबरच, या व्हिडीओमध्ये मोठ्याने गाणी लावल्याचे पाहायला मिळत आहे. हमजा हरिस या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, “मी या गाण्यावर खूप काळापासून काम करीत होतो. जेव्हा पार्टीमध्ये हे गाणे लावण्याची वेळ आली तेव्हा विचार केला की, याला व्हिडीओ पाहिजे. असा व्हिडीओ बनविण्याची कल्पना कभी खुशी कभी गम या चित्रपटातून मिळाली. मी विचार केला की करीना कपूर डान्स करत आहे, असा व्हिडीओ दाखवला तर तो सर्वात वेगळा असेल. प्रामाणिकपणे सांगायाचे तर याआधी रेव्ह पार्टीत असे कोणीही केले नसेल.” पुढे असेही लिहिले की, कधीतरी हा व्हिडीओ करण जोहर व करीना कपूर खान यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना तो आवडेल, अशी आशा करत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “हे अॅनिमेशन खूप वाईट आहे. ती कामावर जात असल्यासारखे का वाटत आहे?”, दुसर्‍या एका नेटकऱ्याने लिहिले, “कराचीमध्ये रेव पार्टी होत आहे. मला वाटले की त्यांच्याकडे फक्त क्रिकेटसाठी पैसे आहेत.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हे करीनाने बघण्याआधी डिलिट कर”, एका नेटकऱ्याने हा अपमान असल्याचे लिहिले आहे.

अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. “हे बंद करा”, “तंत्रज्ञानाचा अंत”, “डिलिट कर”, “याला पाकिस्तानमध्ये परवानगी आहे का?”, “हा संपूर्ण व्हिडीओ विक्षिप्त आहे”, अशा अनेक कमेंटस या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. तर काहींनी हा व्हिडीओचे कौतुकदेखील केले आहे. दरम्यान, करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. पती सैफ अली खानवर चाकूहल्ला झाल्यानंतर हे कुटुंब मोठ्या चर्चेत होते.