इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाली आहे. हा चित्रपट अन् यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शाहिद कपूर (आदित्य) आणि करीना कपूर (गीत) यांची प्रमुख भूमिका असलेली ही प्रेमकथा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. इतक्या वर्षांनंतर, करीनाने तिच्या ‘गीत’ या भूमिकेबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. मुख्य म्हणजे इतक्या वर्षांत पहिल्यांदाच तिने शाहिद कपूरबद्दल वक्तव्य केलं आहे.
‘ब्रूट इंडिया’ला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत करीना कपूरला विचारण्यात आलं की, ‘जब वी मेट’ चित्रपटाबद्दल आणि तिच्या ‘गीत’ या भूमिकेबद्दल तिला काय खास वाटतं? करीना म्हणाली, “माझ्या मते, गीतची प्रत्येक गोष्ट खास आहे. गीत म्हणजे एक भारतीय सिनेअभिनेत्री कशी असावी याचं प्रतिक आहे, असं मला वाटतं. सगळ्यांना ‘गीत’सारखं आयुष्य जगावं असं वाटतं. मी आज जेव्हाही ‘जब वी मेट’ बघते, तेव्हा मला नेहमी वाटतं की हा सिनेमा खूप खास आहे.”
हेही वाचा…स्वतःचा अभिनय दाखवायला करीना कपूरने ठेवलेला चित्रपटाचा खास शो, पण घडलं उलट; किस्सा सांगत म्हणाली…
करीना पुढे म्हणाली, “गीत आणि आदित्यची पात्रं एकमेकांवर अवलंबून होती. शाहिदने त्याची भूमिका अत्यंत जबरदस्त साकारली आहे, त्यामुळेच माझीही भूमिका मी प्रभावीपणे करू शकले. मी त्याचे आभार मानते, कारण मला वाटत नाही की त्याच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकला असता.”
‘जब वी मेट’ ऑक्टोबर २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक ठरला होता. या सिनेमाची एकूण कमाई ५०.९ कोटी रुपये होती. या चित्रपटाच्या उल्लेखनीय यशानंतर, या सिनेमाचा तमिळमध्ये ‘कंदेन कधलई’ या नावाने रिमेक आला, तर हा सिनेमा तेलुगू भाषेत ‘प्रिय प्रियथमा’ या नावाने डब करण्यात आला.
हेही वाचा…रणबीर कपूर लेक राहासाठी गातो चक्क मल्याळम अंगाई, तर आजी सोनी राजदान गातात ‘हे’ गाणं
‘जब वी मेट’ चं शूटिंग संपण्याच्या दोन दिवस आधीच झालं ब्रेकअप
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या प्रेमप्रकरणाचा शेवट ‘जब वी मेट’ च्या शूटिंगदरम्यान झाला असं म्हटलं जातं. या चित्रपटानंतर दोघं पुन्हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि समीक्षकांचंही कौतुक मिळवलं होतं. ‘गालट्टा इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत, शाहिद-करीनाच्या ब्रेकअपबद्दल बोलताना इम्तियाज अली म्हणाला, “(ते दोघं) चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात वेगळे झाले. चित्रपटाचं बरंच शूटिंग होऊन गेलं होतं. त्यांच्या ब्रेकअपनंतर केवळ दोन दिवसांचं शूट बाकी होतं, पण ते दोघंही अत्यंत व्यावसायिकपणे वागले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही सुरू होतं, त्याचा त्यांच्या कामावर कोणताही परिणाम झाला नाही.”
‘जब वी मेट’ आणि ‘उडता पंजाब’ या दोन चित्रपटांशिवाय, शाहिद आणि करीनाने २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छुप छुप के’ या चित्रपटातही एकत्र काम केलं आहे.