आलिया भट्ट व करीना कपूर खान यांनी ‘कॉफी विथ करण’च्या ताज्या भागात हजेरी लावली. यावेळी दोघींनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. रॅपिड-फायर सेगमेंटमध्ये, करणने करीनाला विचारलं की ती एखाद्या चित्रपटात सारा अली खानच्या आईची भूमिका साकारेल का? करीनाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सारा ही करीनाचा पती सैफ अली खान व त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी आहे.
करणने करीनाला विचारले, “तुला जर एखाद्या चित्रपटात साराच्या आईची भूमिका करायला दिली गेली तर तू करशील का?” करीना म्हणाली, “मी एक अभिनेत्री आहे. मी सर्व वयोगटाच्या भूमिका करू शकते. त्यामुळे कधी काय करावं लागेल ते सांगता येत नाही.” त्यावर करण म्हणाला, “म्हणजे तू ती भूमिका करण्यास तयार आहे ?” करीना म्हणाली, “हो मी कोणत्याही प्रकारचा अभिनय करण्यासाठी तयार आहे.”
त्यानंतर करणने करीनाला दाक्षिण्यात इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार्सची काही नावं दिली आणि त्यातील एकाची एकत्र काम करण्यास निवड करायला सांगितलं. करणने विचारलं, “तुला कोणत्या साऊथच्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल? प्रभास, राम चरण, विजय देवरकोंडा, अल्लू अर्जुन की यश?” करिनाने उत्तर दिले की, “मी केजीएफ गर्ल आहे. त्यामुळे मी यशला निवडेन. मी केजीएफ पाहिला आहे.” खरं तर हे ऐकून करणला धक्काच बसला कारण करीनाने यापूर्वी म्हटलं होतं की ती एकही चित्रपट पाहत नाही. तसेच तिने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ देखील पाहिला नसल्याचा खुलासा केला होता.
या शोमध्ये आलियाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. आपण ‘परफेक्ट कपूर बहू’ असल्याचं ती म्हणाली. दरम्यान, पहिल्यांदाच आलिया व करीन या नणंद-वहिनीच्या जोडीने करणच्या शोमध्ये हजेरी लावली. आलियाचा पती व अभिनेता रणबीर कपूर हा करिनाचा चुलत भाऊ आहे.