बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान नुकतीच ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ इंडियाच्या राऊंडटेबल चर्चेत सहभागी झाली होती. या चर्चेत तिच्याबरोबर विकी कौशल, शबाना आझमी, राजकुमार राव आणि अॅना बेन हे कलाकारही होते. या चर्चेदरम्यान, करीनाने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा आणि त्याचा आमिर खानवर झालेल्या परिणामाचा उल्लेख केला. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशामुळे आमिर खूपच निराश होता, असे तिने सांगितले.
चित्रपटाच्या अपयशावर आमिरची प्रतिक्रिया
या राऊंडटेबल चर्चेत करीनाच्या त्या वक्तव्याचा संदर्भ दिला ज्यामध्ये तिने चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खान आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्याशी संवाद साधल्याचे सांगितले होते. करीना म्हणाली, “मला या चित्रपटाचा खूप अभिमान आहे. लाल सिंग चड्ढा हा अतिशय सुंदर आणि प्रामाणिक प्रयत्नांतून तयार झालेला चित्रपट होता.” या चित्रपटाबद्दल खुलासा करताना करीना कपूर म्हणाली की, “आमिर खान हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर प्रचंड निराश झाला होता.”
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर करीनाला आमिर एका कार्यक्रमात भेटला होता. आमिर विनोदाने तिला म्हणाला, “पिक्चर नाही चालला आपला, पण तू तरी माझ्याशी बोलशील ना?” या शब्दांतून त्याची निराशा स्पष्ट होत होती. मात्र, करीनाने तिच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली, “ ‘रुपा’ या भूमिकेने मला जे दिलंय, ते कदाचित सिंघम (अगेन)सारखा एखादा ब्लॉकबस्टरही देऊ शकणार नाही.”
‘रुपा’ची भूमिका आणि चित्रपटाची प्रामाणिकता
शबाना आझमीने करीनाला यावर अधिक स्पष्ट बोलण्यास सांगितले असता, करीनाने सांगितले की अद्वैत चंदन यांनी लिहिलेली ‘रुपा’ची भूमिका खूपच सुंदर होती. या भूमिकेत ती खूप गुंतून गेले होते. करीनाने सांगितले की, ‘लाल सिंग चड्ढा’ पूर्णत: मनापासून बनवलेला चित्रपट होता. “सर्वांनी त्यांच्या परीने सर्वोत्तम कामगिरी केली.”
हेही वाचा…लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
करीनाने ‘लाल सिंग चड्ढाची’ एक खास आठवण सांगितली. या चित्रपटावेळी करीना प्रेग्नंट होती. त्या वेळी चित्रपटाचे ६० टक्के शूटिंग पूर्ण झाले होते. तिचा पती सैफ अली खानने तिला ही बातमी आमिरला सांगण्यास प्रोत्साहित केले. जेव्हा करीनाने आमिरला ही बातमी सांगितली, तेव्हा आमिर खूप सकारात्मकपणे म्हणाला, “मला खूप आनंद झाला. आम्ही तुझी वाट पाहू आणि चित्रपट पूर्ण करू.” या अनुभवाबद्दल करीना म्हणाली, “या प्रसंगाने मला हे समजलं की काही लोक तुम्हाला आणि तुमच्या निर्णयांना खरोखरच महत्त्व देतात.”