बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मोठ्या चर्चेत असतात. आता प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने सलमान खान, आमिर खान व शाहरुख खान या तीन दिग्गज कलाकारांबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाली करिश्मा कपूर?
करिश्मा कपूरने ‘पिंकविला’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या तीन अभिनेत्यांबद्दल वक्तव्य केले आहे. सलमान, शाहरुख व आमिर या तिघांमध्ये काय वेगळेपण आहे, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अभिनेत्रीने म्हटले, “ते सगळेच विशेष आहेत. प्रत्येक जण इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि ही पद्धतच त्यांना इतरांपेक्षा वेगळे करणारी गोष्ट आहे. सलमान खान हा नेहमी विनोद करताना वा मस्ती करताना दिसेल. मात्र जेव्हा शूटिंग सुरू असते, तेव्हा तो गांभीर्याने काम करतो. शाहरुखच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तो खूप मेहनत करणारा अभिनेता आहे. काम करताना तो तुमच्यासोबत बसेल. तुमच्या शूटिंगची स्क्रिप्ट समजून घेईल आणि आमिर खान हा परफेक्शनिस्ट आहे. मला वाटते की, मी त्यांच्याबरोबर काम करताना, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. मला कलाकारांचे निरीक्षण करायला आवडते. मी खरोखरच त्यांचे निरीक्षण करून त्यांच्यातील या विशेष बाबी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात काम करताना आम्ही सगळे एकत्र मोठे झालो आहोत.”
हेही वाचा: सलील कुलकर्णी यांच्या नव्या हॉटेलचं नाव ‘बँगलोर कॅन्टीन’ का आहे? जाणून घ्या…
९० च्या दशकात करिश्मा कपूरने बॉलीवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आघाडीची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. तिने ‘शक्ती : द पॉवर’ , ‘दिल तो पागल है’, ‘झिरो’ या चित्रपटांत शाहरुख खानसोबत काम केले आहे. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटाने करिश्मा कपूरला वेगळी ओळख दिली होती. या चित्रपटात आमिर खानबरोबर ती मुख्य भूमिकेत दिसली होती. त्याशिवाय ‘बॉम्बे टॉकीज’, ‘अंदाज अपना अपना’, ‘अंदाज नया नया’ या चित्रपटांत आमिर खान आणि करिश्मा कपूर यांनी एकत्र काम केले होते. सलमान खानबरोबर करिश्मा कपूरने ‘जुडवा’, ‘बॉडीगार्ड’, ‘दुल्हन हम ले जायेंगे’, ‘चल मेरे भाई’, ‘कहीं प्यार ना हो जाये’, ‘हम साथ साथ है’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केले आहे. ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटात सलमान, करिश्मा व आमिर या तिघांनी एकत्र काम केले आहे.
सध्या करिश्मा कपूर इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वात परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसून येत आहे.