बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना ही सोशल मीडियावर सक्रिय असते. चित्रपटांबरोबरच ती तिच्या बोल्ड लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. नुकतंच करिश्माने तिच्या लहानपणीच्या आठवणींबद्दल खुलासा केला आहे. करिश्माने ‘क्यू की सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. करिश्माचं बालपण हे चांगलं गेलं असलं तरी तिचे वडील मात्र तिच्या जन्मानंतर नाराज असल्याचं तिने स्पष्ट केलं.
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करिश्माने तिच्या कुटुंबाबद्दल खुलासा केला आहे. एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात करिश्माचा जन्म झाला. तिच्या कुटुंबातील सगळेच लोक हे व्यवसायात होते. शिवाय तिच्या वडिलांनासुद्धा उद्योगात तोटा झाल्याने त्यांची आर्थि परिस्थिती फारशी चांगली नव्हती हे करिश्माने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.
सिद्धार्थ कन्नन या युट्यूबरशी बोलताना करिश्मा म्हणाली, “मी मोठी झाल्यावर माझ्या आईने सांगितलं कि, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील फार खुश नव्हते. त्यांना मुलगा हवा होता आणि एका टिपिकल गुजराती कुटुंबाप्रमाणे त्यांच्यावरही ते दडपण होतं. माझ्या आईला दोन मुली आहेत, त्यावेळी माझे आजी आजोबासुद्धा आम्हाला चांगली वागणूक देत नसत. यातूनच तावून सुलाखून मी खंबीर झाले.”
पुढे करिश्मा म्हणाली, “जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईने आठवडाभर माझा चेहेरा पाहिला नाही, माझे वडील तर तब्बल महिनाभर मला बघायलाही फिरकले नाहीत. जेव्हा मला आईने हे सांगितलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. याचा अर्थ माझ्या वडिलांचं माझ्यावर प्रेमच नव्हतं असं नव्हे तर दुसऱ्यांदासुद्धा त्यांच्या पोटी मुलगीच जन्माला आली होती अन् कुटुंबाचं दडपण होतं, कारण मुली असल्याने आम्हाला कशी वागणूक मिळणार आहे याचा त्यांना अंदाज आला होता. त्यानंतर मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी तुमचा मुलगा होऊन दाखवेन आणि मी ते त्यांना करून दाखवलं.”
करिश्मा तन्नाने रणबीर कपूरच्या ‘संजू’मध्येदेखील एक छोटीशी भूमिका निभावली होती. याबरोबरच करिश्मा बऱ्याच रीयालिटि शोमध्येसुद्धा झळकली आहे. आता लवकरच तिची ‘स्कूप’ ही हंसल मेहता दिग्दर्शित वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.