बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा कार्तिक आर्यन सध्या ‘आशिकी ३’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात कार्तिक दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाबरोबर झळकणार आहे. ‘आशिकी ३’ चित्रपटात अभिनेता एका रॉकस्टारचं पात्र निभावत आहे. यासाठीच कार्तिकने त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. मोठे केस, मोठी दाढी या लूकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कार्तिक दिसत आहे. अशातच ‘आशिकी ३’ चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
माहितीनुसार, अनुराग बासू दिग्दर्शित ‘आशिकी ३’ चित्रपटाचं चित्रीकरण सिक्कीममधील गंगटोकमध्ये होतं आहे. इथले चित्रीकरणाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये कार्तिकचा ‘आशिकी ३’ चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे. यावेळी श्रीलीलादेखील त्यांच्याबरोबर दिसत आहे. कार्तिक व श्रीलीला एकत्र परफॉर्म करत असतात. त्याचवेळी कार्तिक रागाच्या भरात एका व्यक्तीला मारताना दिसत आहे. अभिनेत्याच्या मागे अनुराग बासू सीन चित्रीत करताना पाहायला मिळत आहेत.
‘आशिकी ३’ चित्रपटाचं चित्रीकरण पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे बरेच व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमधील कार्तिकचा लूक पाहून अनेकांना शाहिद कपूरचा कबीर सिंहची आठवण झाली आहे. तर काही जण ‘रॉकस्टार’, ‘अॅनिमल’ चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकशी त्याची तुलना करत आहेत. तसंच ‘आशिकी ३’ चित्रपटामुळे दुसऱ्या बाजूला कार्तिक आर्यन डेट करत असल्याच्या चर्चा होतं आहेत. कार्तिक श्रीलीलाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकच्या कौटुंबिक कार्यक्रमात श्रीलीला दिसली होती, त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.
दरम्यान, १९९० साली ‘आशिकी’ चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. महेश भट्ट दिग्दर्शित व राहुल रॉय, अनु अग्रवाल, दीपक तिजोरी अभिनीत ‘आशिकी’ चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटातील गाणी अजूनही तितक्याच आवडीने ऐकली जातात. ‘आशिकी’ चित्रपटाचा दुसरा भाग २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर झळकले होते. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यानंतर आता लवकरच कार्तिक आर्यन व श्रीलीलाचा ‘आशिकी ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘आशिकी ३’ हा पहिल्या दोन चित्रपटांसारखा सुपरहिट ठरतो की नाही, हे येत्या काळात पाहायला मिळेल.