बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन कायमच चर्चेत असतो. ‘भूल भूलैय्या २’, ‘शहजादा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘पती पत्नी और वो’, ‘लव आज कल’, ‘लुका छुपी’, ‘फ्रेडी’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. कार्तिक सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
कार्तिक आर्यनचा बॉडिगार्ड सचिन अंजर्लेकर याचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. कार्तिक आर्यननेही त्याच्या मराठमोळा बॉडीगार्डच्या लग्नाला हजेरी लावली होती. बॉडीगार्डच्या लग्नासाठी कार्तिक अगदी साध्या वेशात पोहोचला होता. त्याने पिवळ्या रंगाचा शर्ट व जीन्स परिधान केली होती.
हेही वाचा>> “मला सचिन तेंडुलकरला प्रपोज करायचं होतं”, अंकुश चौधरीच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली…
कार्तिकने बॉडीगार्डच्या लग्नातील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोला त्याने “सचिन व सुरेखा हार्दिक अभिनंदन. पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा,” असं कॅप्शन देत त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिक आर्यनच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, कार्तिक आर्यन चित्रपटांची मेजवानी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’, ‘आशिकी ३’ व ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र आहे. कार्तिक ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.