चित्रपट, टीव्ही मालिका, नाटक अशा विविध माध्यमांतून मनोरंजन करणाऱ्या कलाकारांविषयी प्रेक्षकांना उत्सुकता असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी जाणून घेणे अनेकांना आवडते. आता अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)ने लहान असताना काय केले, याची आठवण त्याच्या आईने सांगितली आहे.

डिओड्रंटचा वापर करून…

कार्तिक आर्यनची आई माला तिवारी यांनी ‘गल्लाटा इंडियाला’ नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कार्तिक आर्यनच्या बालपणीचे किस्से सांगितले आहेत. त्यांनी एक आठवण सांगत म्हटले, “कार्तिकला प्रत्येक गोष्टीबद्दल फार कुतूहल असायचे. एक दिवस त्याला एका डिओड्रंटच्या बाटलीवर ज्वलनशील चिन्ह दिसले. खरंच आग लागते का, हे त्याला बघायचे होते. त्याने त्याच्या बहिणीला मेणबत्ती लावायला सांगितले. त्यानंतर त्याने तो डिओड्रंट त्या मेणबत्तीवर फवारला. दुर्देवाने त्याने तो डिओड्रंट मोठ्या प्रमाणात स्प्रे केला होता. त्यामुळे त्याच्या बहिणीच्या केसांना आग लागली. त्यांनी ती आग विझवली; मात्र कार्तिकला त्याच्या या प्रयोगासाठी मार बसला होता.”

कार्तिकने यावर बोलताना म्हटले, “मला तिचे केस जाळायचे नव्हते. ती चुकीच्या जागी बसली होती. जेव्हा मेणबत्तीवर मी डिओड्रंट स्प्रे केला तेव्हा तिच्या एका बाजूच्या केसांनी आग पकडली. मी लगेच त्यावर पाणी टाकायला सुरुवात केली. त्यानंतर माझी आई माझ्यावर खूप रागावली होती.”

त्याबरोबरच जेव्हा माला तिवारी यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या पहिल्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळीसुद्धा त्यांनी कार्तिक आर्यनचे काही किस्से सांगितले होते. त्यांनी म्हटले होते, “जेव्हा कार्तिक इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता, त्यावेळी तो अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहत होता. त्याच्या परीक्षेवेळी त्याने ‘प्यार का पंचनामा’ची काहीशी स्क्रिप्ट लिहिली होती. त्यादरम्यान तो ‘आकाशवाणी’च्या शूटिंगसाठीदेखील जायचा. त्याने थर्ड हॅण्ड कार विकत घेतली होती. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीपासून त्याच्या शूटिंगच्या लोकेशनपर्यंत तो ती गाडी चालवत जायचा. मीदेखील त्याच्याबरोबर प्रवास करायचे आणि त्याला अभ्यासात मदत करायचे. त्याला सांगायचे की, हा भाग महत्त्वाचा आहे. तो परीक्षेसाठी गेल्यानंतर मी त्याची तीन तास बाहेर वाट बघायचे. एकदा तो पेपर देऊन आल्यावर मी त्याला विचारलेले की, परीक्षेत काय लिहिलेस? त्यावर तो म्हणालेला, “मी ‘आकाशवाणी’ची गोष्ट लिहून आलो आहे.” त्याच्या आईने असे म्हणताच कार्तिकने लगेच हसत सांगितलेले, “ती खरं तर ‘पंचनामा २’ची स्टोरी होती.”

हेही वाचा: “तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा

दरम्यान, कार्तिक आर्यन नुकताच ‘भूल भुलैय्या ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये माधुरी दीक्षित आणि विद्या बालन प्रमुख भूमिकांत आहेत.