कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. मनोरंजन लक्षेत्रातील कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना तो यशस्वीपणे आपले करिअर करत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर कार्तिक आर्यनने घराघरात ओळख निर्माण केली आहे. आज कार्तिक त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
कार्तिकने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. त्याच्या अभिनयाची केवळ प्रेक्षकांनीच नाही तर समीक्षकांनीही प्रशंसा केली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यशाची शिडी चढणाऱ्या कार्तिकने बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी खूप मेहनत घेतली आहे. कार्तिक नेहमीच त्याच्या आयुष्याबद्दल खुलेपणाने भाष्य करत असतो. एका मुलाखतीत त्याने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांना उजाळा देत एके काळी त्याच्याकडे ट्रेनचे तिकिट काढायलाही पैसे नसायचे असा खुलासा त्याने केला होता. आज जरी त्याच्याकडे चित्रपटांच्या भरपूर ऑफर्स येत असल्या तरी सुरुवातीला त्याला अनेकदा ऑडिशनमध्ये नकार मिळाला.
एका मुलाखतीत कार्तिकने सांगितले होते की, जेव्हा तो चित्रपटांमध्ये काम शोधण्यासाठी मुंबईला आला तेव्हाचे दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो अनेकदा नवी मुंबई ते मुंबई लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करत असे. इतकंच नाही तर स्ट्रगलच्या दिवसांमध्ये कार्तिक जवळपास १२ जणांबरोबर रूम शेअर करत असे.
हेही वाचा : “…तर चित्रपट पाहणार नाही”; ‘हेरा फेरी’च्या निर्मात्यांवर प्रेक्षक नाराज
कठोर परिश्रमानंतर कार्तिकला २०११ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. त्याने ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आणि सर्वांच्या नजरेत आला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या सर्वच चित्रपटातील कामाचं खूप कौतुक केलं गेलं. आता आगामी काळात तो ‘फ्रेडी’ आणि ‘शेहजादा’, सत्यप्रेम की कथा या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.