Madhuri Dixit : “माधुरी दीक्षित इज डान्स अँड डान्स इज माधुरी” असं कॅप्शन दिलेले अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामागे एक खास कारण आहे तो म्हणजे नुकताच पार पडलेला आयफा पुरस्कार सोहळा. या कार्यक्रमातील ‘धकधक गर्ल’चा नृत्याविष्कार पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

माधुरीने या पुरस्कार सोहळ्यात तिच्या अनेक लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला. याशिवाय अभिनेत्री शाहरुख खानबरोबर “चाक धूम धूम…” गाण्यावर थिरकल्याचंही पाहायला मिळालं. याचे व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत. वयाच्या ५७ व्या वर्षी “चोली के पीछे क्या है” गाण्यावर माधुरीला त्याच एनर्जीने डान्स करताना पाहून केवळ चाहतेच नाहीतर बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सुद्धा थक्क झाल्याचं पाहायला मिळालं. याच सोहळ्यातील खास व्हिडीओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

माधुरी दीक्षितचा परफॉर्मन्स झाल्यावर कार्तिक तिचं भरभरून कौतुक करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. कार्तिक माधुरीला म्हणतो, “किती जबरदस्त परफॉर्मन्स झाला… बाहेर सगळे तुम्हाला पाहून वेडे झालेत. एवढा सुंदर डान्स होता.” याशिवाय बॅकस्टेजला सगळ्यांनी माधुरीचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं. सर्वांनी आपल्या डान्सचं कौतुक केल्याचं पाहून माधुरीने सुद्धा कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले.

माधुरी हा सुंदर व्हिडीओ शेअर करत लिहिते, “२५ वं वर्ष साजरं करण्याची आयफाची ही किती भन्नाट पद्धत आहे! एक रोमांचक रात्र आणि अविस्मरणीय क्षण… स्टेजवर परफॉर्म करून एक वेगळाच आनंद मिळाला. तुम्ही हा संपूर्ण डान्स लवकरात लवकर पाहावा याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”

माधुरीच्या या पोस्टवर तिच्या सगळ्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावर प्रार्थना बेहेरेने “तुम्ही बेस्ट आहात” अशी कमेंट केली आहे. तर, अदा खानने यावर “लेजेंट” आणि गजराव राव यांनी माधुरीचा डान्स पाहून “मॅजिक” अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, माधुरीच्या या पोस्टवर अवघ्या काही तासात १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना ‘झी टीव्ही’वर १६ मार्चला रात्री आठ वाजता पाहता येणार आहे.