अभिनेत्री सारा अली खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने करण जोहरच्या कॉफी विथ करण कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने कार्तिक आर्यनबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य केले होते. आता कार्तिक आर्यनने सारा अली खानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकने सारा अली खानने ब्रेकअपबाबत केलेल्या भाष्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिक म्हणाला, “जर दोन व्यक्तींमध्ये एखादं नातं असेल, तर दुसऱ्या व्यक्तीनं त्या नात्याबद्दल भाष्य करू नये. प्रत्येकानं आपल्या नात्याचा मान ठेवला पाहिजे. मी माझ्या नात्याबद्दल कधीही काहीही बोलत नाही. त्यामुळे समोरच्याकडूनही मी तशीच अपेक्षा ठेवतो. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र असतात तेव्हा दोघांनी त्या वेळच्या नात्याचा मान ठेवला पाहिजे. त्याचबरोबर स्वत:चाही मान ठेवला पाहिजे.”
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझनच्या तिसऱ्या भागात अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडेने हजेरी लावली होती. या क्रार्यक्रमात साराने कार्तिक आर्यनबरोबरच्या ब्रेकअपवर भाष्य केले होते. सारा म्हणालेली, “माझ्यासाठी हे सोपं नव्हतं. जेव्हा माझं एखाद्याबरोबर नातं तयार होतं; मग ती मैत्री असो, व्यावसायिकरीत्या असो किंवा प्रेमाची; तेव्हा मी स्वत:ला त्या नात्यात पूर्णपणे गुंतवून घेते. आजची परिस्थिती आणि उद्याची परिस्थिती वेगळी असू शकते. पण, एकाच क्षेत्रात राहून एकमेकांबरोबर बोलायचं नाही किंवा एकमेकांसमोर कधीच यायचं नाही, असं नाही होऊ शकत.”
कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच त्याचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याच्यबरोबर कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. आता तो चंदू चॅम्पियन चित्रपटा झळकणार आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच कार्तिक ‘कॅप्टन इंडिया’ आणि ‘भूल भुलैय्या ३’ मध्येही दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.