बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. तब्बल एक दशकानंतर कार्तिकने ही पदवी मिळवली आहे. शनिवारी (११ जानेवारी २०२४) रोजी कार्तिकने आपल्या इन्स्टाग्रामवर या समारंभाचे काही क्षण शेअर केले, जिथे तो विद्यार्थ्यांबरोबर नाचताना आणि आपल्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमताना दिसला.

“बॅकबेंचरपासून मंचावर उभं राहण्यापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय आहे”

कार्तिकने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिले, “बॅकबेंचरपासून मंचावर उभं राहून पदवी स्वीकारण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच सुंदर आहे.” पुढे त्याने लिहिले, “डी. वाय. पाटील कॉलेजने मला खूप आठवणी दिल्या, स्वप्न दिली आणि अखेर माझी पदवीही दिलीत (त्यासाठी फक्त दहा वर्ष लागले!). विजय पाटील सर, माझे अद्भुत शिक्षक, आणि येथील तरुण स्वप्नवेड्या विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद – मला माझ्या घरी परत आल्यासारखं वाटतंय.”

हेही वाचा…चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

या व्हिडिओमध्ये कार्तिकने त्याचे नाव असलेले जर्सी जॅकेट घातले होते, जिथे तो विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहाला संबोधित करताना दिसला. समारंभाचा मुख्य क्षण म्हणजे कार्तिकने मंचावर विद्यार्थ्यांबरोबर त्याच्या ‘भूलभुलैया ३’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर नृत्य सादर केले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने भारावलेला कार्तिक

व्हिडीओमध्ये कार्तिक आपल्या कॉलेजमध्ये परतताना विद्यार्थ्यांच्या प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात व स्वागतात येताना दिसला आहे. कॅम्पसमधून फिरताना तो आपल्या शिक्षकांशी संवाद साधत जुन्या आठवणींमध्ये रमताना दिसला. याच दरम्यान, त्याने कॉलेज बोर्डवर सही करून या भेटीची आठवण सोडली.

पाहा व्हिडीओ –

या व्हिडीओमध्ये कार्तिकचे अनेक क्षण दिसून येतात. तो चाहत्यांशी गप्पा मारताना दिसला आहे, या व्हिडीओत त्याचे काही चाहते त्याला भेटवस्तू देताना दिसले. याचवेळी कार्तिकची एक चाहती त्याला भेटून रडली. कार्तिकने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच २०११ मध्ये लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा…“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

२०२३ मध्ये कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘भूलभुलैया ३’ या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली. जानेवारीत कार्तिक नव्या लूकमध्ये, लांब केस आणि दाट दाढीसह दिसला, त्याचा हा लूक अनुराग बासूंच्या ‘आशिकी ३’ या नव्या चित्रपटासाठी तर नाही ना? अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये रंगली.

कार्तिकने गेल्या सप्टेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले असून, अद्याप त्याच्या भूमिकेबद्दल गुप्तता राखली आहे. या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीही आहे. याशिवाय, कार्तिकने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सद्वारे निर्मित ‘तू मेरी, मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा…सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट

अनीस बझ्मींच्या ‘भूलभुलैया ३’ या भय-हास्य चित्रपटात कार्तिक रूह बाबा या पात्राची भूमिका साकारत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २५० कोटींची कमाई केली होती.

Story img Loader