अभिनेता कार्तिक आर्यनने तो मोठा होत असताना आलेल्या आर्थिक अडचणींबद्दल भाष्य केलं आहे. त्याच्या आई व वडिलांनी आपापल्या करिअरसाठी घेतलेलं कर्ज, त्याची परतफेड यामुळे सगळ्या खर्चांचे हिशेब ठेवले जायचे, असं कार्तिकने सांगितलं. सुरुवातीच्या काळात मित्रांकडून पैसे उसने घेऊन जगायचो, त्यामुळे इतके पैसे कमवायचे की कुटुंबीय आरामात राहू शकतील, असं कार्तिकने ठरवलं. .
राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकला विचारण्यात आलं की स्टारडमनंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत. उत्तर देत कार्तिक म्हणाला, “मी ग्वाल्हेरमध्ये मोठा होत असताना आमच्यावर कर्ज होतं, कारण माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या करिअरसाठी कर्ज घेतले होते. आम्ही गरीब होतो, असं नाही पण आम्ही श्रीमंत नव्हतो. आम्ही ईएमआय भरणारे लोक होतो. अशा परिस्थितीत तुमचा प्रत्येक खर्चाचा हिशेब ठेवला जातो. बराच काल आमच्या उत्पन्नापेक्षा जास्त आमच्यावर कर्ज होतं.”
कार्तिक पुढे म्हणाला, “मी मुंबईत आलो तेव्हाही मी शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं. कर्ज माझ्या आयुष्याचा भाग राहिलंय, मित्रांकडून पैसे उसने घेणं ही नेहमीचीच गोष्ट होती. मला मित्रांकडून पैसे उसने घेण्याची आणि मी ते काही दिवसात परत करीन हे सांगायची सवय होती. मुंबईत आल्यावर मला समजलं की आता मला पैसे कमवावे लागतील, कारण मी पैसे उधार घेऊन, ट्रेनने प्रवास करून थकलो होतो.”
कार्तिक आर्यनला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी ७० हजार रुपये मिळाले होते. ‘प्यार का पंचनामा’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या मानधनात बरीच वाढ झाली आहे. आता एका चित्रपटातून तो २० ते ४० कोटी रुपयांपर्यंत कमावतो असं त्याने सांगितलं. तो कमवत असलेल्या पैशांचं व्यवस्थापन त्याचे आई-वडील नीट करतात, असं त्याने नमूद केलं. कारण चित्रपटसृष्टीतील काम अस्थायी आहे, माझा एखादा चित्रपट नाही चालला, तर काय होईल, अशी भीती त्यांना वाटत असते, असं कार्तिक म्हणतो.
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”
याशिवाय कार्तिकने इंडस्ट्रीतील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “मी जेव्हा अवॉर्ड शोमध्ये जायचो तेव्हा कोणाकडून तरी लिफ्ट घ्यायचो. मी ठरवलं की जेव्हा माझ्याकडे पैसे असतील तेव्हा मी कार घेईन. मी घेतलेली पहिली कार थर्ड-हँड होती. पण आता मी कार खरेदी करत असतो, पण माझ्यासाठी ती मोठी गुंतवणूक नाही. मला वाटतं की तुमची ड्रीम कार आणि स्वप्नातलं घर असणं चांगली गोष्ट आहे. आता लवकरच मी माझ्या स्वप्नातील घर बांधणार आहे.”