बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आतापर्यंतच्या प्रत्येक चित्रपटात हटके भूमिका साकारून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ‘प्यार का पंचनामा’, ‘भूल भुलैय्या २’, ‘सत्यप्रेम की कथा’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर कार्तिक लवकरच ‘चंदू चॅम्पियन’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’चे शूटिंग सध्या लंडन येथे सुरु आहे. नुकत्याच ‘बीबीसी एशिया’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकने आजारी असून चित्रपटाचे शूटिंग कसे पूर्ण केले याबाबत खुलासा केला आहे.
कार्तिक शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगताना म्हणाला, “‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात जीवनाचे दोन टप्पे आहेत. यातील एका टप्प्यासाठी मला वजन वाढवणे गरजेचे आहे. यासाठी चित्रपटाचे टीमने मला २ महिन्यांचा कालावधी दिला आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. शूटिंगदरम्यानचा एक किस्सा आवर्जून सांगेन तो म्हणजे, आम्ही लंडनमधील ऑलिम्पियन सेंटरमध्ये शूट करताना मला जवळपास १०२ ताप होता आणि संपूर्ण शूटिंग थंड पाण्यातील होते.”
“अंगात १०२ ताप असताना मी थंड पाण्यात जाण्याआधी ३-४ गोळ्या घ्यायचो आणि शूटिंग पूर्ण करायचो. तेव्हा कबीर खान मला तुझा अभिमान वाटत आहे असे म्हणाले होते. गेल्या काही वर्षात काम करून मला वैयक्तिक आयुष्यात वेगळा दृष्टीकोन मिळाला आहे.” असे कार्तिकने सांगितले.
हेही वाचा : “लोणावळ्याला थांबले म्हणून दुप्पट टोल?”, ऋजुता देशमुखने व्यक्त केला संताप; म्हणाली, “रितसर तक्रार केली पण…”
दरम्यान, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावला आहे. आता कार्तिकचे चाहते त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.