२०२२ मध्ये मोठमोठे सुपरस्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले, पण कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैया २’ने इतिहास रचला. आता कार्तिक आर्यन पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. अल्लू अर्जुनच्या ‘आला वैकुंठपुरमलो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘शेहजादा’ हा चित्रपट कार्तिक आर्यन प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कार्तिक व्यस्त आहे.
नुकतंच त्याने रजत शर्मा यांच्या ‘आप कि अदालत’ या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान त्याने राजत शर्मा यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. याच मुलाखतीमध्ये कार्तिकने प्रथमच करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मधून बाहेर पडण्याबद्दल भाष्य केलं. कोविड काळात कार्तिक आर्यन करण जोहरच्या ‘दोस्तान २’ या चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी समोर आली. कार्तिकने पैसे जास्त मागितले म्हणून त्याला करण जोहरने चित्रपटातून काढल्याच्या बऱ्याच बातम्या समोर आल्या होत्या.
याबद्दल कार्तिकने अखेर या कार्यक्रमात मौन सोडलं. तो म्हणाला, “मला माझ्या घरच्यांनी एक शिकवण दिली आहे, की जर एक लहान मोठ्यात काही बेबनाव असेल तर लहान व्यक्तीने त्याबद्दल कुठेही वाच्यता करू नये, हे माझ्या घरचे संस्कार आहेत. त्यामुळेच मी याबद्दल काही बोलणार नाही, पण तेव्हा कोविड सुरू होता आणि चित्रपटात बरेच बदल होणार होते, त्यामुळेच मी यातून बाहेर पडलो. बाकी मी पैशांसाठी यातून बाहेर पडलो वगैरे वगैरे या सगळ्या कानगोष्टी आहेत. निश्चितच मी लालची माणूस आहे, पण मी पैशांसाठी नाही तर चित्रपटांच्या स्क्रिप्टसाठी लालची आहे.”
कार्तिक आर्यनच्या ‘शेहजादा’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला असून प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. खुद्द करण जोहरनेही हा ट्रेलर लाइक आणि शेअर करत कार्तिकची प्रशंसा केली आहे. या चित्रपटात कार्तिकबरोबर क्रीती सनॉन, परेश रावल, मनीषा कोइराला हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.