Naagzilla: बॉलीवूडमध्ये इच्छाधारी नाग-नागीणवर बरेच चित्रपट झाले आहेत. एक काळ असा होता की, नाग-नागीणच्या कथा प्रेक्षकांचा खूप आवडायच्या. त्यामुळे एक ट्रेंड सुरू झाला होता. ज्यामध्ये नाग मेल्यानंतर नागीण बदला घेताना दिसते. पण, आता बऱ्याच वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये इच्छाधारी नागाची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये बॉलीवूडचा चॉकलेट बॉय इच्छाधारी नागाच्या रुपात झळकणार आहे. ‘नागझिला’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे.
हिंदी मालिकाविश्वात ‘नागीण’ मालिकेचा ट्रेंड अजूनही सुरू आहे. मौनी रॉय, अनीता हसनंदानी, सुरभि ज्योति, तेजस्वी प्रकाश, अदा खान आणि सुरभी चांदना यांच्यासारख्या अभिनेत्री आतापर्यंत नागीणच्या रुपात झळकल्या आहेत. या नागिणींनी छोटा पडदा चांगलाच गाजवला आहे. त्यानंतर प्रदीर्घ काळाने मोठा पडद्यावर इच्छाधारी नाग धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे.
‘नागझिला’ चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन इच्छाधारी नागाच्या भूमिकेत झळकणार आहे. मंजुलिकानंतर कार्तिकचा हा आणखी एक दमदार अवतार पाहायला मिळणार आहे. कार्तिकने सोशल मीडियावर ‘नागझिला’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये कार्तिकचा आवाज ऐकू येत आहे. “इच्छाधारी नाग…रुप बदलने की शक्ती रखनेवाला साप…जैसे की मैं. प्रेमवदेश्वर प्यारे चंद…उम्र ६३१ साल, इन्सानो वाली पिक्चर बहुत देखी है, अब देखो नागो वाली पिक्चर…फन फैलाने आ रहा हूँ…नागपंचमीपर”, असं कार्तिकच्या आवाजात ऐकून येतं आहे.
‘नागझिला’ चित्रपट हा एक फँटसी कॉमेडी असणार आहे. ‘फुकरे’ फेम मृगदीप सिंह लांबाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर गौतम मेहरा हे लेखक आहेत. धर्मा प्रोडक्शन आणि महावीर जैन फिल्म्स बॅनरखाली हा चित्रपट होतं आहे. कार्तिक आणि धर्मा प्रोडक्शनचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांचा ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट व्हॅलेंटाइन डे २०२६मध्ये प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, ‘नागझिला’ टीझरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पुढच्या वर्षी नागपंचमीच्या मुहूर्तावर १४ ऑगस्ट २०२६ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कार्तिक आर्यनसह या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आगामी चित्रपटात नागीणच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर श्रद्धा ‘नागझिला’मध्ये पाहायला मिळणार की तिचा दुसरा चित्रपट असणार आहे? हे येत्या काळात स्पष्ट होईल.