असं म्हणतात की ‘इच्छा तिथे मार्ग’ हा मिळतोच. या वाक्यावर विश्वास ठेवत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेक जण देशाच्या कानाकोपऱ्यातून मायानगरी मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. बॉलीवूड सिनेसृष्टी याचं उत्तम उदाहरण आहे. शाहरुख खानपासून ते नवाजुद्दीन सिद्दिकी आणि दीपिका पदुकोण अशा अनेक नामवंत कलाकारांनी या सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली. बॉलीवूडचा रोमॅंटिक हिरो म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या कार्तिक आर्यनचा अभिनय क्षेत्रातील प्रवासदेखील काहीसा असाच आहे. बॉलीवूडमध्ये कोणताही गॉड फादर नसताना त्याने केवळ स्वत:च्या मेहनतीवर अभिनय क्षेत्रात नाव मिळवलं. ‘लुका छुपी’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘भुलभुलैय्या २’ आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘चंदू चॅम्पियन’मधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
कार्तिक सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सध्या तो त्याच्या जुहूतील घरामुळे चर्चेत आहेत. कार्तिकने काही दिवसांपूर्वीच जुहूमध्ये स्वत: खरेदी केलं. हे घर कार्तिक आणि त्याची आई माला तिवारी या दोघांच्याही नावावर आहे. जुहूच्या प्रशस्त अशा सिद्धीविनायक सोसायटीतील त्याचा फ्लॅट १७.५ कोटींचा आहे. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कार्तिकने जुहूचा फ्लॅट भाड्याने दिल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा- रणवीर-दीपिका होणार शाहरुख खानचे शेजारी! मन्नतच्या बाजूला ‘इतक्या’ कोटींच्या घराचे बांधकाम सुरू
‘इतकं’ आहे कार्तिकच्या घराचं भाडं
हे घर खरेदी करताना त्याने १.५ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० हजार रजिस्ट्रेशन फी भरली होती. या घराचं भाडं महिना ४ लाख रुपये इतके आहे. याच सोसायटीत कार्तिकच्या आई-वडिलांचंदेखील आठव्या मजल्यावर घर आहे. या घराची किंमत साधारण १६.६ कोटी इतकी आहे. बरेच बॉलीवूड कलाकार हे जुहू येथे राहतात. कार्तिक राहत असलेली सोसायटी ही समुद्राच्या अत्यंत जवळ आहे. सी फेसिंग घर असल्याने सूर्यास्त पाहणं एक सुखद अनुभव आहे. प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तरदेखील याच परिसरात राहतात. कार्तिक राहत असलेल्या सोसायटीत अनेक नामांकित व्यावसायिक आणि सेलिब्रिटींचे वास्तव्य आहे. या सोसायटीचा परिसर आणि मुख्य म्हणजे समुद्र घराच्या बाल्कनीतून दिसत असल्याने अनेकांना या ठिकाणी आपल्या हक्काचं घर असावं असं वाटतं.
हेही वाचा- सलमान खानच्या बॉडीगार्डने घेतली कोट्यावधींची आलिशान कार, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हणाला….
कार्तिकबद्दल अजून सांगायचं म्हटलं तर ‘भुलभुलैय्या २’ मध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातदेखील कार्तिक मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिसऱ्या भागात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन या अभिनेत्रीदेखील असणार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd