बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेल्या कार्तिक आर्यनने अभिनय क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याचं हे स्वप्न पूर्णही झालं. २०११ मध्ये लव रंजन यांच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारा कार्तिक आर्यन आज बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. या वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘भूल-भुलैय्या २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. चॉकलेट बॉय आणि रोमँटिक हिरो अशी ओळख असलेल्या कार्तिकने त्याच्या जवळपास सगळ्याच चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिलेत. पण जेव्हा त्याचा ‘कांची: द अनब्रेकेबल’ चित्रपट शूट झाला तेव्हा धम्माल किस्सा घडला होता. त्यावेळी किसिंग सीन शूट करताना दिग्दर्शकांनीही त्याच्या समोर हात जोडले होते.
कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा हा किस्सा २०१४ मधील आहे. कार्तिक आर्यन सुभाष घई यांच्या ‘कांची: द अनब्रेकेबल’ चित्रपटात काम करत होता. या चित्रपटात त्याचा अभिनेत्री मिष्टीबरोबर एक किसिंग सीन होता. जो कार्तिकसाठी अजिबात सोपा नव्हता. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला कार्तिक आर्यनला त्यावेळी किसही करता येत नव्हतं. सुभाष घई यांनी कार्तिक आर्यनची अवस्था पाहून त्याच्यासमोर अक्षरशः हात जोडले होते. तब्बल ३७ रिटेक घेतल्यानंतर सुभाष घई यांना कार्तिककडून परफेक्ट शॉट मिळाला होता.
आणखी वाचा- Kartik Aaryan Birthday: ‘हे’ आहे कार्तिक आर्यनचं खरं नाव, तुम्हाला माहितीये का?
कार्तिकने एका मुलाखतीत या चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला, “सुभाष घई यांना एका सीनमध्ये पॅशनेट किस हवं होतं आणि मला किस करताच येत नव्हतं. एवढे रिटेक झाल्यानंतर शेवटी मी त्यांनाच बोलणार होतो की सर आता तुम्हीच करून दाखवा की हे कसं करायचं आहे. एक किसिंग सीन माझ्यासाठी डोकेदुखी ठरेल याचा मी विचारही केला नव्हता. अखेर तब्बल ३७ रिटेकनंतर त्यांना हवा तसा शॉट मिळाला. पण या सगळ्यात ते खूप चिडले होते.” अर्थात आता कार्तिक आर्यन त्याच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये किसिंग सीन देतो.
आणखी वाचा-ना पोर्टफोलिओ, ना गॉडफादर… सामान्य कुटुंबातून आलेला कार्तिक आर्यन कसा झाला बॉलिवूडचा ‘शहजादा’
कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया २’ व्यतिरिक्त, ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘आकाशवाणी’, ‘लव्ह आज कल’, ‘धमाका’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘पति पत्नी और वो’ ‘लुका छुपी’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे. कार्तिकचा ‘फ्रेडी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय तो ‘शहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’मध्येही दिसणार आहे.