आज बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये गणल्या जाणाऱ्या कार्तिक आर्यनचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये आउटसायडर म्हणून काम सुरू करणं आपल्यासाठी फार कठीण होतं असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आधी मॉडेलिंग अन् मग अभिनय क्षेत्रात एंट्री घेणारा कार्तिक आज बॉलिवूडमधला सर्वात यशस्वी अन् लोकप्रिय स्टार झाला आहे. खासकरून सगळे स्टार्स जेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत होते त्या काळात ‘भूलभुलैया २’सारखा हिट चित्रपट देऊन कार्तिकने स्वतःला सिद्ध केलं आहे.
कार्तिक रील लाईफबरोबरच खऱ्या आयुष्यातही तितकाच साधा अन् प्रेमळ आहे. त्याला भेटायला आलेल्या चाहत्यांना तो अगदी शांतपणे फोटो देतो, शिवाय तो त्यांच्याशी फार नम्रतेनेही वागतो. नुकताच कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक विमानप्रवास करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मी निर्मात्यांना पैसे परत केले कारण…”, २०१६ नंतर घेतलेल्या ब्रेकबद्दल अभिषेक बच्चन प्रथमच बोलला
विशेष गोष्ट म्हणजे कार्तिक हा प्रवास इकोनॉमी क्लासने करत आहे. इतर स्टार्ससारखं कार्तिकने बिझनेस क्लास किंवा वेगळं प्रायव्हेट जेट घेण्यापेक्षा सामान्य लोकांबरोबर इकोनॉमी क्लासने प्रवास करणं कार्तिकने पसंत केलं आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या जागेवर जाऊन बसताना दिसत आहे. त्याला पाहून इतरही प्रवासी चांगलेच उत्सुक झाल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
याआधीही दीपिका पदूकोण, विकी कौशल अन् कतरिना कैफ यांनीही असाच इकोनॉमी क्लासमधून प्रवास करतानाचे फोटोज अन् व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. सेलिब्रिटीज असूनही या लोकांचं सामान्य लोकांमध्ये अगदी सहजपणे मिसळून जाणं हे सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही. कार्तिक आर्यन लवकरच कियारा अडवाणीसह त्याच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातून झळकणार आहे.