प्रदर्शनाच्या आधीपासून वादात अडकलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिवसेंदिवस नवीन वादात अडकत आहे. चित्रपटातील संवाद, कलाकारांचे लूक, व्हीएफएक्स आणि त्यातील दृश्ये अशा बऱ्याच गोष्टी या वादास कारणीभूत ठरल्या आहेत. अशातच या चित्रपटावरून शेजारच्या नेपाळ देशातही वाद सुरू झाला आहे. परिणामी नेपाळने ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी कोणतेही भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रामायणावर आधारित हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून नेपाळमध्येही विरोध होत आहे. इथे सीतेच्या जन्माच्या दाव्यांवरून वाद होत आहे. याबद्दल काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. हा वाद वाढला असून नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त ‘आदिपुरुष’च नव्हे तर कोणताही हिंदी चित्रपट चालवणार नाही, असा निर्णयही काठमांडू महापालिकेने घेतला आहे.
नेमका वाद काय?
‘आदिपुरुष’चे निर्माते सीतेच्या जन्माच्या ठिकाणाची नावाची दुरुस्ती करेपर्यंत हा चित्रपट चालवणार नाही, असे काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी ट्वीट केले होते. नेपाळ सरकार मते, सीतेचा जन्म नेपाळच्या तराई प्रदेशातील जनकपूर इथं झाला होता. तर भारतात सीतेचा जन्म सीतामढी इथे झाला असं मानलं जातं. या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये नेहमीच वाद होत आले आहेत.
दरम्यान, नेपाळने चित्रपटावर बंदी घातल्यानंतर ‘आदिपुरुष’चे निर्माते याबद्दल कोणता निर्णय घेतात, नेपाळमध्ये इतर भारतीय चित्रपटांवरील बंदी हटवली जाईल का, हे येत्या काळातच कळेल.