Katrina Kaif Praises Vicky Kaushal For Chhaava : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित ‘छावा’ सिनेमा आज ( १४ फेब्रुवारी ) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘छावा’चा प्रीमियर शो पार पडला. या सोहळ्याला विकीने पत्नी कतरिना कैफच्या साथीने उपस्थिती लावली होती.
कतरिना सुंदर अशी साडी नेसून या सोहळ्याला हजर राहिली होती. नवऱ्याचा ‘छावा’ सिनेमा पाहून कतरिना नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या नवरोबांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘छावा’ पाहिल्यावर कतरिना नेमकं काय म्हणालीये जाणून घेऊयात…
कतरिना कैफची पोस्ट
कतरिना कैफ पोस्ट शेअर करत लिहिते, “किती सुंदर सिनेमॅटिक अनुभव होता… छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अतिशय सुंदर पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर तुम्ही खऱ्या अर्थाने कमाल केलीत. मी सिनेमा पाहून थक्क झाले. चित्रपटाची शेवटची ४० मिनिटं… त्या क्षणाला मी खरंच नि:शब्द झाले, माझे शब्द संपले. काल रात्री हा सिनेमा मी पाहिला आणि आज सकाळी उठल्यापासून पुन्हा एकदा मी ‘छावा’ केव्हा पाहणार असं मला झालंय… या चित्रपटाचा माझ्यावर खूप प्रभाव पडलाय जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. विकी कौशल… तू सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट आहेस. तू जेव्हा मोठ्या पडद्यावर येतोस तेव्हा काहीतरी वेगळं घेऊन येतोस. प्रत्येक शॉट, तू पडद्यावर आणलेली ऊर्जा आणि सिनेमातल्या त्या मूळ पात्रांमध्ये तू कसा सहज रुपांतरीत होतोस… हे पाहून खूपच छान वाटतं. तुझ्या प्रतिभेचा खूप अभिमान आहे. दिनेश विजन काय सांगू मी? तुम्ही खरंच खूप दूरदर्शी आहात. तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्याचं सोनं करता. सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलं आहे. हा सिनेमा रुपेरी पडद्यासाठीच बनवला गेलाय… संपूर्ण टीमचा मला खूप अभिमान आहे. #छावा”
दरम्यान, ‘छावा’मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकाने महाराणी येसूबाईंची भूमिका निभावली आहे. याशिवाय औरंगजेबाच्या भूमिकेत सिनेमात अक्षय खन्ना आहे. संतोष जुवेकर, आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी अशी दमदार स्टारकास्ट प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळते.