बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीला बॉलीवूडमध्ये काम करून आता २० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. कतरिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच कतरिनाने तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : धनुषबरोबर १८ वर्षांचा संसार मोडल्यावर ऐश्वर्या रजनीकांत करणार दुसरं लग्न?
कतरिना कैफच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती विकी कौशल नसून तिचे वैयक्तिक सहकारी अशोक शर्मा आहेत. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर त्यांचे आभार मानत खास पोस्ट शेअर केली आहे. अशोक शर्मा हे जवळपास गेल्या २० वर्षांपासून कतरिनाबरोबर काम करत आहेत.
कतरिना या पोस्टमध्ये लिहिते, “आज अशोक शर्मांबरोबर काम करून २० वर्षे पूर्ण झाली. गेली २० वर्षे त्यांनी मला खूप चांगले सहकार्य केले. अशोजींबरोबर मी सर्वात जास्त वेळ घालवला आहे. माझ्या आनंदात, दु:खात मला समजून घेत भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांनी मला अनेकदा प्रेरणा दिली. या सगळ्यात त्यांनी माझे आरोग्य उत्तम राहावे याचीही काळजी घेतली.”
हेही वाचा : “१२ वर्षांची मेहनत आणि जिद्द…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे हिंदी मालिकेत पदार्पण, शेअर केली खास पोस्ट
“जेव्हा मला सेटवर त्रास झाला होतो, तेव्हा अशोकजी रडले आहेत. आता फक्त माझा चेहरा पाहिला तरीही, मला काय हवे आहे हे त्यांना लगेच कळते. त्यांचे सदैव माझ्याकडे लक्ष असते. यापुढील २० वर्षही माझ्याबरोबर असेच राहा…” असे कतरिनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अभिनेत्रीच्या या पोस्टवर प्रियांका चोप्राने ‘बेस्ट’ अशी कमेंट केली आहे. प्रियांकासह सोनल चौहान, मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी यांनीही कतरिनाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच ‘टायगर ३’ चित्रपटात सलमान खानबरोबर मुख्य भूमिका साकारणार आहे.