Katrina Kaif Visit Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. याच दिवशी महाकुंभमेळ्यातील शेवटचं शाही स्नान पार पडेल. याच पार्श्वभूमीवर आज बरेच सेलिब्रिटी प्रयागराजला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी विकी कौशलने महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं होतं. आता त्याच्या पाठोपाठ अभिनेत्याची पत्नी कतरिना कैफ आणि त्याची आई या दोघीही प्रयागराजला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.
सोमवारी ( २४ फेब्रुवारी ) कतरिना फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घालून महाकुंभमेळ्यात पोहोचली होती. यावेळी तिच्या सासूबाई वीणा कौशल सुद्धा उपस्थित होत्या. साध्या अन् पारंपरिक लूकमध्ये कतरिना अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी सर्वप्रथम तिने गुरू स्वामी चिदानंद स्वामी आणि साध्वी भगवती यांचे आशीर्वाद घेतले.
कतरिनाने मीडियाशी संवाद साधताना आजचा पूर्ण दिवस प्रयागराजमध्ये वास्तव्य करणार असं सांगितलं आहे. महाकुंभमेळ्याला गेल्यावर कतरिनाने सर्वात आधी परमार्थ निकेतन आश्रमाचे आध्यात्मिक प्रमुख स्वामी चिदानंद सरस्वती यांचं दर्शन घेतलं. यावेळी अभिनेत्री म्हणाली, “मी खूप भाग्यवान आहे की, मी यावेळी इथे येऊ शकले. मी खरोखर आनंदी आणि कृतज्ञ आहे. आम्ही स्वामी चिदानंद सरस्वतींना भेटलो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मला या जागेची ऊर्जा, याचं सौंदर्य आवडतं. मी संपूर्ण दिवस येथे घालवण्यास उत्सुक आहे.”
कतरिना सासूबाईंबरोबर महाकुंभमेळ्याला पोहोचल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भर गर्दीत ती सासूबाईंना सांभाळताना दिसली. त्यांचं सासू-सुनेचं बॉण्डिंग सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.
दरम्यान, यावर्षी १३ जानेवारी २०२५ रोजी महाकुंभमेळ्याचा प्रारंभ झाला होता. आता येत्या २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभमेळ्याचा समारोप होणार आहे. कतरिनाप्रमाणे यापूर्वी तिचा पती विकी कौशल, अक्षय कुमार, इशा गुप्ता, विजय देवरकोंडा, हेमा मालिनी, बोनी कपूर, सोनाली बेंद्रे, कैलाश खेर, बोनी कपूर, जुही चावला, पंकज त्रिपाठी अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्याचं पाहायला मिळालं आहे.