कतरिना कैफ आणि विकी कौशल हे गेले काही दिवस सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. ९ डिसेंबर २०२१ या दिवशी हे दोघे लग्नबंधनात अडकले, शिवाय यांच्या लग्नाचीसुद्धा खूप चर्चा झाली. लग्नानंतरसुद्धा कतरिना आणि विकी चर्चेत होते. मध्यंतरी एका कार्यक्रमादरम्यान कतरिनाला पाहून लोकांनी ती गरोदर असल्याचाही कयास लावला होता. अर्थात या सगळ्या गोष्टी नंतर खोट्या सिद्ध झाल्या.
एकूणच विकी आणि कतरिना या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना बरंच कुतूहल आहे. नुकताच मुंबई ते दिल्ली विमानप्रवासादरम्यान विकी-कतरिनाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओची चर्चा यासाठी होत आहे की एवढे मोठे सुपरस्टार असूनही त्यांनी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला आहे.
आणखी वाचा : “मी एखाद्याचा जीव घेतला असता…” रिषभ शेट्टीने सांगितला ‘कांतारा’च्या क्लायमॅक्समागील ‘तो’ भयानक किस्सा
मुंबई ते दिल्लीच्या फ्लाइटदरम्यान एका प्रवाशाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. विकी आणि कतरिना हे त्यांच्या बाजूच्याच सीटवर बसले आहेत. दोघेही त्यांच्या मोबाइलमध्ये व्यस्त आहेत. कतरिनाने काळ्या रंगाचा ट्रॅकसूट, मास्क आणि गॉगल्स परिधान केले आहेत आणि विकीने लाल रंगाचा ट्रॅकसूट आणि राखाडी रंगाची हुडी परिधान केली आहे.
हा व्हिडिओ पाहून विकी आणि कतरिनाचे चाहते खुश झाले आहेत. त्यांनी ‘इकॉनॉमी क्लास’ने प्रवास करताना पाहून कित्येकांनी कॉमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. कॉमेंट करत काही लोकांनी विकी आणि कतरिनाला ‘डाउन टू अर्थ’ असं म्हंटलं आहे तर काहींनी व्हिडिओ काढणाऱ्य व्यक्तीवर टीका केली आहे. कोणाच्याही परवानगीशिवाय असा व्हिडिओ काढू नये असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. विकी कौशल नुकताच ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात झळकला, तर कतरिना तिच्या विजय सेतुपतीबरोबर आगामी ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.