अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या ‘घूमर’ चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. त्यानिमित्ताने तो रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावत आहे. नुकताच तो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या पर्वामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला. या शोचे होस्ट अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा मंचावर एकत्र दिसले. यावेळी अभिषेकने त्याचे मेगास्टार वडील अमिताभ यांच्याबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला.
सोनी एंटरटेनमेंट चॅनलच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. यामध्ये रात्री कुटुंबाने एकत्र बसून चित्रपट पाहायचं ठरल्यावर अमिताभ बच्चन काय करतात, याचा खुलासा केला. “एकत्र बसून चित्रपट पाहणं ही आमच्या कुटुंबाची आवडती गोष्ट आहे. “बाबा रोज रात्री म्हणतात, ‘चला फिल्म बघूया, एखादी चांगली अॅक्शन फिल्म लावा.’ चित्रपट सुरू झाल्यावर तुम्ही इंटरव्हलमध्ये पाहाल तर ते झोपलेले असतात,” असं अभिषेक सांगतो. त्यानंतर तो झोपण्याची अॅक्टिंग करतो. आणि चित्रपट पाहताना त्याचे वडील बिग बी झोपून जातात असं तो सांगतो. अभिषेकने हा किस्सा सांगताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो.
दरम्यान, ‘घूमर’ एका दिव्यांग महिला खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर बेतलेला चित्रपट आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेरने केली आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चित्रपट फक्त ८५ लाख रुपयांचा गल्ला जमवू शकला.