सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाचा प्रदर्शित होताच त्यावर टीका होत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाची कथा चार महिलांची आहे ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
आता नुकतंच केरळची मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या चित्रपटावर भाष्य केलं आहे. हा ‘आरएसएस’चा अजेंडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. इतकंच नव्हे तर असे चित्रपट काढणारी मंडळी लव्ह जिहादचा मुद्दा उचलून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचंही पिनराई यांइ स्पष्ट केलं आहे. पिनाराई विजयन यांच्या म्हणण्यानुसार केरळमध्ये लव्ह जिहादचा मुद्दा कोर्टाने, तपास यंत्रणांनी तसेच केंद्रीय गृहमंत्रालयानेही खोडून काढला आहे.
आणखी वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाबद्दल अनुपम खेर यांनी आमिरची केली कानउघडणी; म्हणाले “सत्य स्वीकारायला…”
इंडिया टूडेच्या एका वृत्तानुसार विजयन म्हणाले, “ही मंडळी (आरएसएस) खोट्या गोष्टी आणि चित्रपटाच्या माध्यमातून धार्मिक तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. संपूर्ण संघ परिवार कोणत्याही पुराव्याशिवाय या खोट्या गोष्टी पसरवत आहे. केरळच्या ३२००० महिलांना इस्लाम कबूल केला हे धादांत खोटं आम्ही या ट्रेलरमधून प्रथमच पाहिलं. हे खोटं कथानक संघ परिवारानेच रचलेलं आहे. अशा प्रचारकी चित्रपटांमधून मुस्लिमांप्रती निर्माण होणारा द्वेष हा त्यांना केरळच्या राजकारणात फायद्याचा ठरू शकतो.”
नुकतंच कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील या चित्रपटावर टीका केली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “कदाचित ही ‘तुमच्या’ केरळची कथा असू शकते, पण ही ‘आमच्या’ केरळची कथा बिलकुल नाही.” या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी या चार अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ५ मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.