‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे सध्या अदा शर्मा चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये तिने ‘शालिनी उन्नीकृष्णन’ हे पात्र साकारले असून तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येत आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रम भट्ट यांच्या ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘द केरला स्टोरी’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत असून अदा शर्माकडेही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.
अभिनेत्री अदा शर्मा आता ‘द गेम ऑफ गिरगिट’ या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अदा एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाची निर्मिती गंधार फिल्म्स ॲण्ड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली असून दिग्दर्शन ‘हेट स्टोरी-२’ फेम विशाल पंड्या यांनी केले आहे. या चित्रपटात अदासोबत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा : १२ फ्लॉप चित्रपटानंतर अमिताभ रातोरात झाले स्टार; ‘तो’ सुपरहिट सिनेमा ५० वर्षांनी ओटीटीवर होणार रिलीज!
‘द गेम ऑफ गिरगिट’च्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची कथा ‘ब्लू व्हेल गेम’ खेळावर आधारित आहे. हा ऑनलाइन खेळ मध्यंतरी तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. गुरुवारी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. “‘द गेम ऑफ गिरगिट’मध्ये मी भोपाळमधील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ‘ब्लू व्हेल’ गेमवर आधारित असून मी साकारत असलेले पात्र ‘गायत्री भार्गव’ ही संपूर्ण केस सोडवणार आहे. याआधी ‘कमांडो’ चित्रपटात सुद्धा मी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे त्यामधील ‘भावना रेड्डी’ ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती,” असे अदा शर्मा म्हणाली.
हेही वाचा : माझे नाव ‘आयुष्मान’ नव्हते; अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला “शाळेत जाण्यापूर्वी…”
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे या चित्रपटात अॅप डेव्हलपरची भूमिका करणार आहे. तो म्हणाला, या चित्रपटातून आजकालची लहान मुले आणि तरुणपिढीला एका संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. तसेच दिग्दर्शक विशाल पंड्या म्हणाले, हा चित्रपट मोबाईल फोनमधील अॅप्सचा अतिवापर करणे, माणसाच्या जीवनात कसे धोकादायक ठरु शकते यावर आधारित आहे.