Kesari Chapter 2 Box Office Collection Day 2 : जालियनवाला बाग घटनेवर आधारित अक्षय कुमारचा चित्रपट ‘केसरी: चॅप्टर 2’ च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे.
आर. माधवन, अक्षय कुमार व अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘केसरी: चॅप्टर 2’ शुक्रवारी (१८ एप्रिल) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा जास्त कलेक्शन केल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत ३० टक्के वाढ झाली आहे. ‘केसरी: चॅप्टर 2’ चे दोन दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.
‘केसरी: चॅप्टर 2’ ची कथा जालियनवाला बाग हत्याकांडासंदर्भात एका वकिलाने ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या खटल्यावर आधारित आहे. चित्रपटात अक्षयने बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे, ज्यांनी जनरल डायर विरुद्ध न्यायालयात खटला लढला होता. जनरल डायरच्या सांगण्यावरून जालियनवाला बाग येथे बैसाखी साजरी करण्यासाठी जमलेल्या शेकडो निष्पाप भारतीयांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंह त्यागीने केले आहे.
‘केसरी: चॅप्टर 2’ चे कलेक्शन किती?
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘केसरी २’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ९.५० कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारची गुड फ्रायडेची सुट्टी होती, तरीही दुसऱ्या दिवसापेक्षा पहिल्या दिवसाचे कलेक्शन कमी होते. ‘केसरी २’ चे ओपनिंग डे कलेक्शन ७.७५ कोटी रुपये होते. या चित्रपटाची दोन दिवसांची कमाई आता १७.२५ कोटी रुपये झाली आहे.
‘केसरी: चॅप्टर 2’ अन् फ्लॉपचं ग्रहण
‘केसरी: चॅप्टर 2’ या चित्रपटाचे बजेट तब्बल २८० कोटी रुपये आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्या तुलनेत या चित्रपटाने दोन दिवसांत फक्त १७ कोटींची कमाई केली आहे. आज रविवारी आधीच्या दोन्ही दिवसांपेक्षा या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल अशी शक्यता आहे. चित्रपटाला बजेट वसूल करण्यासाठी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करावी लागणार आहे. अक्षय कुमारचे मागील ५ वर्षातील जवळपास सर्वच चित्रपट फ्लॉप झाले आहेत, त्याच्या फ्लॉपचं ग्रहण ‘केसरी: चॅप्टर 2’ मुळे संपेल की नाही ते लवकरच कळेल.