अक्षय कुमार, (Akshay Kumar) आर. माधवन (R Madhavan) व अनन्या पांडे यांच्या दमदार भूमिका असलेला बहुचर्चित ‘केसरी २’ (Kesari Chapter 2) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला झाला आहे. तीन मिनिटं दोन सेकंदांचा हा ट्रेलर तुमचे मन हेलावून टाकेल. यावेळी अक्षय अमृतसरमध्ये घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कधीही न ऐकलेली कहाणी पडद्यावर आणत आहे, जी पाहून अनेकांचे डोळे पाणावतील. दर वेळी आपल्या धमाकेदार कहाण्या रुपेरी पडद्यावर आणणारा अक्षय कुमार यावेळी ब्रिटिश राजवटीत अमृतसरमध्ये घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी घेऊन आला आहे.

‘केसरी चॅप्टर २’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहे, ज्यांनी १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला होता. तर, आर. माधवन ब्रिटिश साम्राज्याच्या वकिलाची भूमिका साकारत असून, तो अक्षय कुमारबरोबर न्यायालयात संघर्ष करताना दिसेल. तसेच चित्रपटात अनन्या पांडेचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला अक्षय जनरल डायरला तुम्ही जमावाला रोखण्यासाठी काय केलंत? अश्रुधूर सोडला का? हवेत गोळीबार केला का?, असं विचारतो. त्यानंतर जनरल डायर उत्तर देत म्हणतो की, तो जमाव नसून ते दहशतवादी होते. त्यावर अक्षय “आठ-नऊ-अकरा वर्षांच्या मुलांच्या छातीवर गोळ्या लागल्या, त्यांच्या हातात कोणते शस्त्र होते? हातातले कडे की बंद मूठ, असा प्रश्न विचारतो. या संवादांनी ट्रेलरची सुरुवात होते. पुढे जालियनवाला बाग हत्याकांडाची दृश्यं दाखवली जातात.

अक्षयचे यापूर्वीचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे अक्षय कुमारनं ‘केसरी-२’मधून जोरदार कमबॅक केलं असल्याचं ट्रेलरवरून तरी दिसत आहे. ‘केसरी’मध्ये अक्षय कुमारनं हवालदार ईश्वर सिंहची भूमिका साकारली होती. त्यात सारागढीच्या लढाईचं चित्रण होतं, ज्यामध्ये २१ शिखांनी आपले प्राण दिले होते. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता ‘केसरी-२’मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडासंबंधित हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळेल.

'केसरी २' पोस्टर (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘केसरी २’ पोस्टर (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

करण सिंग त्यागी दिग्दर्शित हा ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘केसरी’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. करण जोहर, हिरू यश जोहर, अरुणा भाटिया व आदर पूनावाला निर्मित या चित्रपटात अक्षय कुमार- सी. शंकरन नायर, आर. माधवन- नेव्हिल मॅककिन्ले आणि अनन्या पांडे- दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.