दाक्षिणात्य चित्रपट व दाक्षिणात्य कलाकार यांचा भारतभर बोलबाला आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या कलाकारांना सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्यांची क्रेझ फक्त दक्षिणमध्येच नसून ती हिंदीत असल्याचंही जाणवतं. दक्षिणेचे कलाकार असलेले चित्रपट चालत नाहीत, असं फार क्वचित होताना दिसतं. त्यामुळे सध्याच्या हिंदी चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात दाक्षिणात्य कलाकार झळकताना दिसतात.

अशातच आता बॉलीवूडमध्ये लवकरच एक भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘रामायण’ या चित्रपटाचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतं. प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित ‘रामायण’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचं दिसतं. रणबीरसह या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीही पाहायला मिळणार आहे. रणबीर श्रीरामांच्या भूमिकेत, तर साई सीतेच्या भूमिकेत असणार आहे.

परंतु, तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच्या आधी अजून एका दाक्षिणात्य अभिनेत्रीनं ऑडिशन दिली होती. ती अभिनेत्री म्हणजे ‘के.जी.एफ’फेम श्रीनिधी शेट्टी. श्रीनिधीने नुकतीच याबाबत एका मुलाखतीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सिद्धार्थ कनन’सह संवाद साधताना श्रीनिधीनं याबद्दल सांगितलं आहे. श्रीनिधी म्हणाली, “आता ‘रामायण’ चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. त्यामुळे मी याबाबत बोलू शकते. या चित्रपटासाठी मी स्क्रीन टेस्ट दिली होती. त्यासह तीन सीनसाठी तयारीही केली होती आणि निर्मात्यांनाही ती आवडली होती.”

पुढे श्रीनिधीने अभिनेत्री साई पल्लवीचा उल्लेख करीत म्हटलं, “मला असं वाटतं की, साई पल्लवी या चित्रपटासाठी योग्य आहे. तिला सीतेच्या भूमिकेत पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.” त्यासह तिनं तिचा ‘के.जी.एफ’ चित्रपटातील सहकलाकार अभिनेता यशचा उल्लेख केला आहे. ती म्हणाली की, या चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारणार आहे. हे समजल्यावर आम्हाला पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळेल, असं वाटलं होतं; पण तसं झालं नाही.”

दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, रावणाच्या भूमिकेत अभिनेता यश आणि हनुमानाच्या भूमिकेत अभिनेता सनी देओल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दोन भाग बनणार असून, पहिला भाग २०२६ मधील दिवाळीदरम्यान प्रदर्शित होणार आहे.