शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. या चित्रपटाने ‘बाहुबली २’ आणि ‘केजीएफ २’लाही मागे टाकलं आहे. आता ‘केजीएफ १’ आता ‘केजीएफ २’ची निर्मिती केलेल्या होम्बले फिल्म्सचे मालक विजय किर्गंदुर यांनी ‘पठाण’ला मिळणाऱ्या यशाबद्दल भाष्य केलं आहे.
‘पठाण’ने प्रदर्शनाच्या सात दिवसांतच भारतातून ३०० कोटींहून अधिक तर जगभरातून ६०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. ‘पठाण’ हा ३०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात कमी दिवसांमध्ये पोहोचणारा चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यातही पठाणची जगभरात यशस्वी घोडदौड सुरु आहे. आता यावर ‘केजीएफ’चे निर्माते विजय किर्गंदुर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
विजय किर्गंदुर म्हणाले, “शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या ब्लॉकबस्टर यशानंतरचे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे दिवस आले आहेत. सिद्धार्थ आनंद आणि शाहरुखची जोडी बॉलिवूडसाठी एक मसिहा म्हणून उदयास आली. प्रेक्षक दीर्घकाळापासून एका सुपरहिट चित्रपटाची वाट पाहत होते, जो ‘पठाण’च्या रुपाने त्यांना मिळाला आहे. ‘पठाण’च्या यशानंतर बॉलिवूड पुन्हा एकदा उड्डाण घेत आहे.”
हेही वाचा : ‘पठाण’च्या कमाईची सर्वत्र होत असली तरी वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये ‘हा’ भारतीय चित्रपट आहे पहिल्या स्थानावर
हा चित्रपट दक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर परिणाम करेल का? असं विचारल्यावर ते म्हणाले, “मला वाटत नाही की याचा कोणत्याही चित्रपट उद्योगावर म्हणजेच उत्तर भारतीय किंवा दक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर परिणाम होईल. पण ‘पठाण’च्या यशामुळे सर्व चित्रपट निर्मात्यांना चांगले चित्रपट बनवण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळेल. ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद हा बॉलिवूड आणि दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीसाठी चांगला आहे कारण प्रेक्षक थिएटरमध्ये येत आहेत. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना थिएटरमध्ये ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपट पहायचे आहेत. त्यामुळे ‘पठाण’च्या यशामुळे सर्व भारतीय चित्रपटांना मदत होईल.”