टीव्ही इंडस्ट्रीत आणि सिनेविश्वात काम मिळवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. अनेकजण अभिनयाची आवड असल्याने मुंबईत येतात आणि एक संधी मिळावी, काम मिळावं यासाठी संघर्ष करत असतात. काम मिळवण्याच्या बदल्यात अनेक कलाकारांना तडजोड करण्याच्या ऑफर दिल्या जातात. आतापर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबर घडलेले कास्टिंग काउचचे प्रसंग सांगितले आहेत. या कास्टिंग काउचमुळेच एका अभिनेत्रीने अभिनयक्षेत्र सोडले.
गाजलेल्या चित्रपटात व काही मालिकांमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्रीला कामासाठी तडजोड करावी लागेल, असं सांगण्यात आलं. त्यामुळे या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत काम न करण्याचा निर्णय घेतला. कोण आहे ही अभिनेत्री आणि आता काय करते ते जाणून घेऊयात.
ही अभिनेत्री म्हणजे ऋचा भद्रा होय. ‘खिचडी’मध्ये चक्की पारेखची भूमिका साकारल्यानंतर ऋचाला लोकप्रियता मिळाली. तिने बा बहू और बेबी आणि मिसेस सारख्या इतर टीव्ही शोमध्येही काम केलं होतं. मात्र आता ऋचा अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. एका मुलाखतीत ऋचाने अभिनय सोडण्याचे कारण सांगितले होते.
‘खिचड़ी’ फेम ऋचा भद्राने अभिनय का सोडला?
“मी एका कास्टिंग डायरेक्टरला भेटले. तो म्हणाला, ‘मला आनंदी ठेव, मी तुला काम देईन’. त्याने मला कामासाठी तडजोड करायला सांगितलं. मी त्याला एका कॉफी शॉपमध्ये भेटू असं म्हटल्यावर तो म्हणाला की त्याला मला हॉटेलमध्ये भेटायचं आहे. इंडस्ट्रीत काम करण्याचा माझ्या सर्व स्वप्नांचा हा शेवट होता. बाल कलाकार म्हणून मी इंडस्ट्रीत जी ओळख निर्माण केली होती ती मला खराब करायची नव्हती,” असं ऋचाने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
ऋचाने सांगितलं अभिनय सोडण्यामागचं कारण
ऋचा अभिनय सोडण्यामागचे आणखी एक कारण सांगितले. “मी आधीपासूनच लठ्ठ आहे. मोठी होत असताना, मला अशा भूमिका दिल्या जात होत्या ज्यात मला ऑन-स्क्रीन एक्सपोज किंवा रोमान्स करायचा होता. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी मला माझ्या कुटुंबाच्या किंवा माझ्या इच्छेविरुद्ध अशा भूमिका करायच्या नव्हत्या,” असं ऋचा म्हणाली होती.
ऋचा भद्रा आता काय करते?
ऋचा भद्राने नंतर अभिनयाला रामराम केला आणि व्यवसायाकडे वळली. आता ती यशस्वी उद्योजिक आहे. तिचे मुंबईत २० सलून आहेत आणि ती तिचा व्यवसाय इतर शहरांमध्ये वाढवण्याची तयारी करत आहे.